ड्रग्सच्या पैशाने सरकारचे खिसे भरलेत – खासदार संजय राऊत
मुंबई: पुण्यात अमली पदार्थांच्या विक्रीचे एक प्रकरण नुकतेच उघड झाले आहे. या प्रकरणावर भाष्य करताना राऊत यांनी अशाच अमली पदार्थांच्या विक्रीतून आलेल्या पैशांनी सरकारचे खिसे भरले असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणांमध्ये असलेले पोलीस, प्रशासन, आमदार, खासदार कोणत्या पक्षाच्या तालावर नाचतात, हे सर्वांनाच माहिती आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी सरकारवर केली आहे.
एकनाथ शिंदे आणि राऊत यांच्यात ‘बांबू’युद्ध
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत सातत्याने सरकारवर करीत असलेल्या टीकेबद्दल त्यांच्यावर टीका केली होती. एक भोंगा थांबला तर दुसरा भोंगा रोज सकाळी वाजत आहे. या भोंग्याला बांबू घालणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यावर राऊत यांनी तशाच शब्दात मुख्यमंत्र्यांवर प्रतिटोला लगावला आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने त्यांना चांगलाच बांबू घातला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत तो आरपार निघणार आहे. या निवडणुकीत मतदार किंवा खुद्द मोदी, शहाच यांना रस्त्यावर आणतील आणि जनताच या गद्दारांना भर रस्त्यावर बांबूने सडकल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका राऊत यांनी केली.
बोकांडी बसवलेले सरकार
विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सरकार बेकायदेशीर आहे. घटनाबाह्य आहे. खुद्द सर्वोच्च न्यायालयानेच ही बाब स्पष्ट केली आहे. तरीही हे निर्लज्जपणे सत्तेत बसले आहेत. हे सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या बोकांडी बसवलेले सरकार आहे, असा आरोपही राऊत यांनी केला.
.. तर इंडिया आघाडीच्या 240 खासदारांचा आवाज घुमणार
संसदेचे अधिवेशन आज पासून सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदारांचा संजय राऊत यांनी मोदी आणि शहा यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले, या पुढील काळात सत्ताधाऱ्यांना लोकांच्या भावना दडपून टाकणे शक्य होणार नाही. यापुढे संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा नव्हे, तर इंडिया आघाडीच्या 240 खासदारांचा आवाज घुमणार.
