पुणे ड्रग्ज प्रकरण : याला राज्य सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार – जयंत पाटील
मुंबई: विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुणे शहराची ही ओळख पुसून आता ड्रग्ज आणि पब्सचे माहेरघर अशी नवी ओळख निर्माण होत आहे. याला राज्यातील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाच्या सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला फटकारले आहे.
पुण्यातील एका नामवंत हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलांचे अमली पदार्थ सेवन करीत असल्याचे व्हिडिओ समाज माध्यमातून प्रसिद्ध झाल्यानंतर मोठी खळबळ माजली आहे. याप्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलिसांबरोबरच उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर लाचखोरीचे आरोप केले आहेत. खासदार मुरलीधर मोहोळ यांनी निर्देश दिल्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणी हॉटेलचा मालक, व्यवस्थापक आणि इतर आठ जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. अमली पदार्थ सेवन करणाऱ्या अल्पवयीन मुलांनाही चौकशीसाठी बोलावले जाणार आहे.
याप्रकरणी जयंत पाटील यांनी सरकारवर टीका करणारी पोस्ट प्रसिद्ध केली आहे. मागील काही वर्षापासून पुणे शहरातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. देशभर गाजलेल्या ललित पाटील प्रकरणानंतर अल्पवयीन मुले ड्रग्सचे सेवन करीत असल्याचे व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिसांना जाग आली आहे. याचा अर्थ पोलिसांना आता खबरी नव्हे तर समाज माध्यमातून माहिती मिळत आहे. पुरषेकार प्रकरणात तर अल्पवयीन आरोपीचे थेट रक्त बदलण्यात आले. पैशाच्या जोरावर व्यवस्था कशी वाकवली जाऊ शकते, याचे हे उदाहरण आहे, अशी टीका पाटील यांनी केली आहे.
अशा प्रकारांमुळे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची उज्वल परंपरा असलेल्या आणि विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुणे शहराला ड्रग्ज आणि पबचे माहेरघर अशी नवी ओळख मिळत आहे.. याला भाजप आणि शिंदे सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार आहे, असा आरोप पाटील यांनी केला..
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून या प्रकरणाची माहिती घेतली असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
