fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

‘काव्यरसदा‌’ सांस्कृतिक इतिहासातील मूल्यात्मक साहित्यकृती : डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे : कवींची प्रतिभा, अभिव्यक्ती समावून घेवून ‌‘काव्यरसदा‌’ हे पुस्तक म्हणजे साहित्य-सांस्कृतिक इतिहासातील मूल्यात्मक साहित्यकृती आहे. तसेच लेखकाच्या समृद्धीची जाणीव करून देणारी कलाकृती आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले.
करम प्रतिष्ठानतर्फे डॉ. स्नेहल कुलकर्णी लिखित ‌‘काव्यरसदा‌’ या रसग्रहणलेख संग्रहाचे प्रकाशन शनिवारी डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबुल पठाण, शिरीष चिटणीस यांची प्रमुख उपस्थिती होती. करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर, प्रज्ञा महाजन, डॉ. स्नेहल कुलकर्णी व्यासपीठावर होते.
शिल्पा चिटणीस, शुभानन चिंचकर, वर्षा कुलकर्णी, ज्योत्स्ना चांदगुडे, वैभव कुलकर्णी, आरती देवगांवकर, योगिनी जोशी, निरुपमा महाजन, रुपा पाटणकर यांचा या कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला.
उत्तम साहित्याला गौरविण्याचे करम प्रतिष्ठान करीत असलेले काम ही अभिनंदनीय बाब आहे, अशा शब्दात करम प्रतिष्ठानेचे कौतुक करून डॉ. सबनीस पुढे म्हणाले, बहुसांस्कृतिक समाजातील एकात्मता डोळ्यासमोर ठेऊन कवी व्यक्त होत असतो. त्याच्या साहित्याचे डॉ. कुलकर्णी यांनी केलेले रसग्रहण म्हणजे वाङ्मयीन संवाद आहे. सध्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातील दुषित वातावरणात लेखिकेने प्रांजळ आणि शुद्ध भूमिकेने ‌‘काव्यरसदा‌’ची मांडणी केली आहे. त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला समीक्षक मिळाला आहे.
अभिरुची समृद्ध व्हावी यासाठी प्रयत्न : भूषण कटककर
पुस्तक प्रकाशनासंदर्भातील करम प्रतिष्ठानची प्रास्ताविकात भूमिका मांडताना भूषण कटककर म्हणाले, नवीन पिढीने मराठी काव्यातील नेमके काय वाचयला हवे याची दिशा ‌‘काव्यरसदा‌’ हे पुस्तक दर्शवते. वाचाकांची सामूहिक अभिरुची अधिक समृद्ध व्हावी या उद्देशाने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. सोशल मीडियावरील अमर्याद व्यक्तीस्वातंत्र्यामुळे जो काव्य-स्वैराचार बोकाळला आहे त्यावर उपाययोजना व्हावी अशी या पुस्तकाची मांडणी आहे.
डॉ. स्नेहल कुलकर्णी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, करम प्रतिष्ठानमध्ये सहभागी झाल्यानंतर साहित्यविषयक आयुष्य समृद्ध होत गेले. ‌‘काव्यरसदा‌’ म्हणजे स्वप्न अचानक पूर्ण झाले अशी आपली भावना आहे. कवींप्रमाणे काव्यानंदाचा आनंद घेत निकोप, निखळ भावनेने अभिव्यक्त होण्याचा प्रयत्न केला आहे.
काव्यातून वेगळेपण समाजासमोर पेरत राहिले पाहिजे असे सांगून शिरीष चिटणीस म्हणाले, समीक्षेबरोबरच कवी, गझलकारांचे साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा करम प्रतिष्ठानचा उपक्रम कौतुकास्पद आहे.
कविता कशी असावी, कवितेचा अर्थ काय आहे हे समजून घेण्यासाठी ‌‘काव्यरसदा‌’ हे पुस्तक खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरणार आहे. वाङ्मयाचे सच्चे दर्शन यातून होणार आहे, असे मत बाबूल पठाण यांनी व्यक्त केले.
मान्यवरांचा सत्कार प्रज्ञा महाजन, भूषण कटककर यांनी केला. काव्यपंक्तींची गुंफण करीत निरुपमा महाजन यांनी सूत्रसंचालन केले. आभार मुक्ता भुजबले यांनी मानले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आयोजित निमंत्रितांच्या गझल संमेलनात वैभव कुलकर्णी, मिलिंद छत्रे, वैशाली माळी, डॉ. मंदार खरे, सुनीति लिमये, कविता क्षीरसागर, भूषण कटककर, वैजयंती आपटे यांचा सहभाग होता. शिल्पा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading