शिरूर तालुक्यात साकारले “मुखई वन” जैवविविधता पार्क
शिरूर : पुणे जिल्ह्य़ातील उजाड जमिनींवर पुन्हा जंगल रुजवण्यासाठी वनराई संस्थेने उपक्रम हाती घेतला असून स्थानिक ग्रामस्थ आणि एनव्हॅलियर कंपनीच्या पुढाकाराने नवी वने साकारण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शिरूर तालुक्यातील मुखई ग्रामस्थांच्या मदतीने एक जैवविविधता उद्यान उभारण्यात आले आहे. ‘जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एनव्हॅलियर, वनराई आणि मुखई ग्रामपंचायत यांच्या संयुक्तविद्यमाने ५०० देशी वृक्ष आणि फळबाग लागवड करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये एनव्हलियर कंपनीचे डायरेक्टर निलेश कुकलेकर, उदय शेट्टी, सुश्मिता मिश्रा, वनराई संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धारिया, सचिव अमित वाडेकर, प्रकल्प प्रमुख राकेश शेलार, मुखई ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
वनराईचे अध्यक्ष रविंद्र धारिया म्हणाले की, गावपातळीवर उजाड व माळरान भागांचे नैसर्गिक अधिवास जतनकरण्याबरोबर आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वार्थाने सुबत्ता वाढविण्याच्या दृष्टीने ‘3E’ म्हणजेच परिसंस्था / पर्यावरण (Ecology), अर्थव्यवस्था (Economy)आणि सक्षमीकरण (Empowerment) हा उपक्रम वनराईद्वारे राबविण्यात येत आहे. शिवाय, या कार्यक्रमाचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे गावस्तरावर २०००-३००० देशी वृक्ष लागवड करुन त्याद्वारे ग्रामपंचायतीला लक्षणीय व चिरस्थायी उत्पन्न मिळवून देणे. प्रत्येक झाडाद्वारे सुमारे ५-६ वर्षानंतर अंदाजे किमान रू. १०००-१२०० वार्षिक उत्पन्न मिळू शकणार आहे. यातून वृक्ष लागवड व संवर्धनाची लोकचळवळ उभी करण्याचा आमचा मानस आहे.
अमित वाडेकर म्हणाले की, ‘3E’ या उपक्रमामुळे ‘गाव तिथे वनराई’ निर्माण होवून स्थानिक पर्यावरणाचे संवर्धन होईलच. याशिवाय वृक्ष लागवडीमध्ये प्राधान्याने चिंच, आंबा, आवळा, जांभूळ, गावठी सिताफळ, कवठ, बोर, करवंद आणि बांबू अशा आर्थिक उत्पन्न देणार्या झाडांना प्राधान्य देण्यात येणार आहे. जेणेकरून ग्रामपंचायतीला उत्पनाचा एक शाश्वत स्त्रेात निर्माण होईल व त्यातून गावामध्ये विविध प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करता येतील. सदर वृक्षलागवड गावातील पडीक, गायरान व स्थानिक देवस्थानच्या सार्वजनिक जागेमध्ये किंवा ओढे, नदया-नाले यांच्या काठावर करण्याचे प्रयोजन आहे.
