लेखकाच्या भावना त्याच्या लिखाणातून प्रकटतात : ल. म. कडू
पुणे : सूक्ष्म, तरल संवेदनांमधून कथेचा जन्म होतो. मंगेश मधुकर हे सामाजिक कंगोरे, आयाम असलेले लेखक आहेत, असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध लेखक, चित्रकार ल. म. कडू यांनी काढले.
गमभन प्रकाशन आयोजित, मंगेश मधुकर लिखित ‘फुलपुडा’ आणि ‘संडे डिश’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन कडू तसेच दिनेश मुळे, संजय येळवंडे, संतोष रंगापुरे, मेधा कुलकर्णी या वाचकांच्या हस्ते झाले. त्या वेळी कडू बोलत होते.
कडू पुढे म्हणाले, सामान्य माणूस अनेक घटनांना सामोरे जात असतो; परंतु काही काळातच तो ती घटना विसरून जातो. लेखक मात्र बघितलेल्या घटना विसरत नाही, काही काळानंतर त्याच्या मनात या घटनांचा धांडोळा सुरू होतो आणि लेखक त्याच्या भावना लिखाणातून प्रकट करतो. लेखक हा नेहमी वाचकांसाठी लिहितो. त्याच्या लेखनातून वाचकाला आवडणाऱ्या भावना पोहोचणे आवश्यक असते. अशा स्वरूपाचे लिखाण मंगेश यांच्या कथांमधून उलगडते. दोन्ही पुस्तकांखाली असलेल्या दोन शब्दातील उपशीर्षकांमुळे पूर्ण पुस्तकांचा उलगडा होतो.
मंगेश मधुकर म्हणाले, रस्त्यावरील घडणाऱ्या घटनांमधून, दृश्यांमधून कथेचा आशय-विषय सुचतो. मी लिहिलेल्या कथा काल्पनिक असल्या तरी त्याला वास्तवतेचे भान आहे. या कथासंग्रहातील ‘फुलपुडा’ ही कथा देखील फुले विकणाऱ्या आज्जींना भेटल्यानंतर सुचली. कुणालाही देताना हात आखडता घेऊ नये हे तत्त्वज्ञान मी त्यांच्याकडून शिकला.
वाचक प्रतिनिधी संजय येळवंडे, दिनेश मुळे, संतोष रंगापुरे यांनीही पुस्तकाविषयी भावना व्यक्त केल्या.
मंगेश मधुकर यांच्या शालेय शिक्षिका कल्पना साळुंखे म्हणाल्या, मंगेशच्या पहिल्या कथेपासून मी त्याच्या लिखाणाची वाचक आहे. आम्ही शिक्षक खऱ्या अर्थाने खूप श्रीमंत असतो, कारण त्यांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उत्तम यश संपादन करीत असतात. अशा गोष्टींमुळे आम्हा शिक्षकांची मान गर्वाने उंचावते. मंगेश भावनिक विषयांवर उत्तम लिखाण करीत आहे.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘फुलपुडा’ या पुस्तकातील ‘कोसळणारा पाऊस’ या कथेचे अभिवाचन अतुल कुलकर्णी यांनी केले तर ‘थँकलेस’ कथेचे वाचन धनश्री तुळपुळे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीराम ओक यांनी केले.
