विरोधकांनी राष्ट्रीय नेतृत्वाला इथे आणले; आमची ताकद किती आहे हे त्यांना मान्य करावे लागले – सुनील तटकरे
माणगाव : राज्यात लोकसभेच्या तिसऱ्या टप्यातील लोकसभा मतदार संघात आता प्रचाराने जोर धरलेला दिसतोय. आज दुसऱ्या टप्यातील प्रचाराचा धुरळा थंडावणार आहे. रायगड लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी शेकापचे जयंत पाटील आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष – शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवत बरं झालं, जयंत पाटील यांनी शरद पवारांना इथे आणले. एका छोट्याशा गावामध्ये राष्ट्रीय नेतृत्वाला आणले आणि आमची ताकद किती आहे हे त्यांना मान्य करावे लागले. मी माझ्या प्रचाराला राष्ट्रीय पातळीवरील नेता अजून आणलेला नाही. माझी महायुती भक्कम आहे. पण तुम्हाला पवारसाहेबांची आठवण आली असे तटकरे यांनी म्हंटले आहे.
माणगाव तालुक्यातील मोर्बा येथे महायुतीचा अल्पसंख्याक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी तटकरे बोलत होते. या जाहीर मेळाव्याला शिवसेना मुख्य प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले , शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुश्ताक अंतुले, बाबा सिद्दीकी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला , अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस नायकवडी, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, डॉ. मुश्ताक मुकादम, नजीब असवारे, आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना तटकरे म्हणाले, जयंत पाटील तुमचं भाषण मी थोडंसं ऐकलं. तुम्ही आणि जितेंद्र आव्हाड, या जगात खोटे बोलणारे कोण असतील तर हे दोघेजण आहेत. तुम्ही शेकापचे प्रदेश सरचिटणीस झालात आणि १९५२ पासून या जिल्हयात लोकसभेच्या निवडणुका झाल्या. तिथपासून कॉंग्रेस आणि तुमच्यात लढत झाली. तुम्ही नेतृत्व घेतलंत आणि या जिल्हयातून शेकाप हद्दपार झाला. २००९ मध्ये शेकाप निवडणूकीत शिवसेनेची लाचारी करत गेला, तुम्ही उमेदवारांना पाठिंबा दिलात. रायगड आणि मावळ मतदारसंघात चार आमदारांची बेगडी तुम्ही शिवसेनेच्या पदरात पाडलीत. म्हणून तुम्हाला विधानसभेत यश मिळाले.
तसेच, बॅरिस्टर अंतुलेंचा फोटो लावण्याचा अधिकार तुम्हाला कुणालाच नाही. आयुष्यभर अंतुले यांचा द्वेष करत या रायगड जिल्हयात आलात पण जयंत पाटील तुम्ही अंतुले यांच्या कृपेमुळे त्याठिकाणी राहिलात हे तुम्ही विसरता कामा नये. अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांनी जरा जरी नजर दाखवली असती तर शेकापचं अस्तित्व १९८० साली संपुष्टात आले असते. मनाचा दिलदारपणा अंतुले यांनी दाखवला पण त्याच अंतुलेंच्या विरोधात तुम्ही काय काय बोलत आलात, याबद्दल खेद व्यक्त करा सा सल्लाही तटकरे यांनी दिला.
शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा खरपूस समाचार घेताना तटकरे म्हणाले, आव्हाड बोललात की, माझ्या मुलीला जयंत पाटील यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष केले. त्यात शरद पवार यांचा सहभाग होता अत्यंत खोटं बोललात… स्वर्गीय मिनाक्षीताई पाटील, विवेक पाटील यांनी माझ्याकडे येऊन सांगितले की आम्हाला युती करायची आहे. अडीच वर्षांनी जिल्हा परिषदेमध्ये सत्तांतर होणार होते. पण त्यावेळी २०१२ मध्ये शेकापने शिवसेनेसोबत युती केली. म्हणून शेकाप जिल्हा परिषदेमध्ये दिसला नाहीतर तो दिसू शकला नसता. ज्यांच्या जागा जास्त येतील त्याच्यापेक्षा पहिली जागा, पहिलं अध्यक्ष पद हे राष्ट्रवादीला दिले जाईल. दुसरं अध्यक्ष पद शेकापला ठरले होते. खोटेपणाने किती वर्षे जगणार आहात, असा रोखठोक सवालही तटकरे यांनी आव्हाडांना केला.
विरोधकांनी गल्लीबोळात सभा घेतल्या आणि तिथे राष्ट्रीय नेतृत्वाला घेऊन आलात पण आम्ही भरमैदानात सभा घेतली आहे. आमचा नियोजित कार्यक्रम ठरला होता. कुणाला उत्तर देण्यासाठी नव्हता. उत्तर द्यायचे झाले तर एक मोर्बा गाव त्यासाठी सक्षम आहे, असेही तटकरे म्हणाले.
