विकास कामं मी केली मात्र त्यांचे श्रेय विद्यमान खासदारांनी घेतले;अजितदादांचा सुप्रिया सुळे यांच्यावर थेट हल्ला
बारामती : मागील दहा वर्षात केंद्रातील एकही काम आपले झाले नाही. ताई म्हणाली आम्हाला हे करा ते केले, ताई म्हणाली नको तर आम्ही नाही केले. योग्य असेल ते शब्द मी ओलांडलेले नाही. बारामती शहर व तालुक्यात मी अनेक कामे किंबहुना सर्वच कामे मी केली आहेत, मात्र आज निवडणुकीच्या तोंडावर विद्यमान खासदारांनी त्यांच्या पुस्तिकेमध्ये हे आम्हीच केले, असे लिहिले आहे. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर थेट हल्ल केला.
बारामतीत राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात पवार बोलत होते.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, बारामती नगरपालिकेची इमारत, पंचायत समिती कार्यालय मी केले, 50 कोटींचे बसस्थानक, पोलिस वसाहत मी केली आहे. सुप्याचे पोलिस स्टेशन असो की अन्य इमारती मी आणल्या आहेत, राज्यात शिवसेना – भाजपची सत्ता असताना बारामतीला निधी मिळत नव्हता असेही त्यांनी सांगितले. आज मी राज्यात उपमुख्यमंत्री नसतो तर कॅनाल ला सुद्धा पाणी आले नसते असेही त्यांनी स्पष्ट केलं.
बारामती तालुक्यात रोजगानिर्मिती माझ्यामुळे झाली असे सांगताना अजित पवार म्हणाले, आज गुढी पाडवा आहे, त्यानिमित्त लोक गाड्यांची खरेदी करत आहेत हे बारामती शहरात फिरताना दिसते, पूर्वी सोमेश्वर किंवा माळेगाव कारखान्याचे पेमेंट झाल्या शिवाय बारामतीकरांची दिवाळी साजरी व्हायची नाही, आज विविध उद्योग इथे आल्यामुळे बारामतीत बारामहिने पैसा आहे, व्यापार, हॉटेल व्यावसाय चांगले चालले आहेत. बारामतीला जोडणारे रास्ते आज तीन – सहा पदरी झाले आहेत, पालखी महामार्गही क्षरांच्या बाहेरून जात आहे, गडकरी साहेबांनी अनेकांना मदत केली तशी बारामतीला केली आहे.
पंतप्रधान मोदी यांना साथ देण्याची गरज असल्याचे सांगताना अजित पवार म्हणाले, मी मोदी यांच्या विरोधात सभा घेतल्या आहेत मात्र मागील दहा वर्षे मोदी साहेबांनी जे काम केलं, त्यांचे व्हिजन मोठे आहे, त्यांनी भारताचा नावलौकिक वाढवला आहे. मोदींचा परदेशात दबदबा, देशाची बॉर्डर सुरक्षित ठेवण्याचे काम मोदींनी केले आहे, आपण आपल्या कुटुंबासोबात दिवाळी साजरी करतो ते सीमेवर तैनात आसलेल्या जवानांसोबत सीमेवर दिवाळी साजरी करतात. पंतप्रधानांनी दहा वर्षात एकही दिवस सुटी घेतलेली नाही त्यांनी फक्त भारत आणि भारताचा विकास हे एकाच ध्येय ठेवले आहे. निर्याती मध्ये देशाचा क्रमांक वरचा कसं राहील हे बघितले. रास्ते उभारणी, दळणवळण, समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, वाढवण बंदारांसाठी निधी देणार आहेत. तसेच नवीन विमानतळ, विमानतळ टर्मिनल, पालखी मार्गासाठी सुद्धा निधी देणार आहे. फलटण रेल्वे नुसतीच चर्चा सुरू होती, मोदींनी प्रत्यक्ष तरतूद केली आहे, असेही पवारांनी सांगितले.
