सुनील तटकरेंनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला, अनंग गितेंवर केला जोरदार प्रहार
पोलादपुर : महायुतीचे रायगड लोकसभेचे अधिकृत उमेदवार सुनील तटकरे यांनी आज पोलादपुर पितळवाडीतून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी शिंदे गटातील आमदार भरतशेठ गोगावले यांनी प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ फोडला. तर तटकरे यांनी पोलादपुर येथील भैरी देवीचे दर्शन घेऊन आपल्या प्रचाराची सुरूवात केली. यावेळी देशाला जगाच्या पाठीवर मजबुतीने बघण्यासाठी आणि ‘विकसित भारत’ हे नरेंद्र मोदींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या निवडणुकीत आपण त्यांचे हात बळकट करायचे आहेत. ज्यावेळी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल त्यावेळी एनडीए पुन्हा सत्तेत आलेले दिसेल, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.
सुनील तटकरे म्हणाले की, या मतदारसंघात काकणभर सरस काम आमदार भरतशेठ गोगावले यांनी केले आहे. साडेतीन हजार कोटींचा निधी त्यांनी आणला. या तालुक्याच्या ज्या गरजा आहेत. विशेष करून तरुणांचे स्थलांतर थांबवण्यासाठी एमआयडीसी आणणे हे गरजेचे आहे. त्यामुळे भारतसरकारच्या माध्यमातून पर्यटनाच्या योजना पोलादपूर तालुक्यात आणल्या जातील. मी विश्वासघात केला असे आरोप काहीजण करतात, ‘अहो तुम्ही केलेले एक काम दाखवा आणि विकास गोगावले यांच्याकडून बक्षीस घेऊन जा’ असे थेट आव्हान तटकरे यांनी अनंत गिते यांना दिले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, संवेदना मनात असाव्या लागतात. नुसत्या मुठी आवळून किंवा शपथ घ्यायला लावून होत नाही. लोकांवर तुमचा विश्वास नाही म्हणून तुम्ही शपथा घ्यायला लावता. गीते फिरायला लागले की समजायचे की निवडणूका लागल्या आहेत. भरतशेठ गोगावले यांनी सहकार्य केले म्हणून त्यांना इथून मताधिक्य मिळाले होते. नाहीतर फक्त निवडणुका आल्या की त्यांना समाज आठवतो. भरतशेठ गोगावले हे त्यागमूर्ती आहेत. मंत्रीमंडळाचा विस्तार होईल त्यात भरतशेठ गोगावले यांचा शपथविधी होईल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, भविष्यात इथली विकासकामे खासदार म्हणून मी आणि मंत्री म्हणून भरतशेठ गोगावले करतील, याची मला खात्री आहे. या ऐतिहासिक पोलादपूरमधून भरभरून मतदान व्हावे आणि मतांची टक्केवारी जास्तीत जास्त दिसली पाहिजे असे आवाहन केले असता नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीसमोर उभा राहून ५० हजाराचे मताधिक्य देऊ असा शब्द आमदार भरतशेठ गोगावले यांनी यावेळी दिला.
