विद्या अभिषेकी यांचे निधन
पुणे : ख्यातनाम गायक व संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध गायक पं. शौनक अभिषेकी यांच्या मातोश्री विद्याताई जितेंद्र अभिषेकी यांचे पुण्यामध्ये वृद्धापकाळाने आज सकाळी दहाच्या सुमारास दुःखद निधन झाले. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या मागे मुलगी मेखला, मुलगा पं. शौनक अभिषेकी, जावई योगेश खडीकर, सून रश्मी अभिषेकी, अभेद व सांजली ही नातवंडे आणि मोठ्या संख्येने शिष्य परिवार आहे.
विद्याताई अभिषेकी या मूळच्या बीड येथील. महाराष्ट्राचे चॅरीटी कमिशनर कै. चंद्रकांत गोडसे यांच्या त्या कन्या होत. हैदराबादमध्ये देखील काही काळ त्यांचे वास्तव्य होते. पुढे मुंबईला त्या राहील्या. विद्या जितेंद्र अभिषेकी यांनी सोशल सायन्स विषयात शिक्षण घेतले होते. नंतर लंडनमध्ये देखील त्यांनी उच्च शिक्षण घेतले. १९६९ मध्ये पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या.
अभिषेकी बुवांच्या संगीतकार्याला आपलं आयुष्य त्यांनी जणू समर्पित केले. गुरुकुलाची सर्व जबाबदारी श्रीमती विद्याताई अभिषेकी यांनी मनोमन स्विकारली आणि पेलली देखील. शौनक अभिषेकी आणि बुवांच्या सर्वच शिष्यांच्या कलाकार म्हणून झालेल्या जडणघडणीत त्यांचा फार मोठा वाटा होता.
