Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

100 दिवसात 7 वी आवृत्ती; ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तक ठरले बेस्ट सेलर

पुणे : “नवी पिढी पुस्तके वाचत नाही, पुस्तके खरेदी करत नाही” असे अनेकांकडून सध्या बोलले जात आहे. परंतु ‘जग बदलणारा बापमाणूस: या पुस्तकाच्या विक्रीने हा गैरसमज मोडून काढला आहे. आजच्या तरुणाईला त्यांच्या भाषेत, त्यांना समजेल, उमजेल अशा भाषेत लिहिलेले पुस्तक दिले तर ते आवर्जून खरेदी करून वाचतात असे या पुस्तकाच्या विक्रीच्या विक्रमातून दिसून येत आहे. व्याख्याते व लेखक जगदीश ओहोळ यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयी प्रेरणादायी पद्धतीने लिहिलेले ‘जग बदलणारा बापमाणूस’ हे पुस्तक 3 डिसेंबर 2023 रोजी पुण्यात फुलेवाडा येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात प्रकाशित करण्यात आले.

त्यानंतर अवघ्या शंभर दिवसात या पुस्तकाच्या सात आवृत्ती प्रकाशित करण्यात आल्या आहेत, असे प्रकाशिका छाया जायकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या पुस्तकाला तरुणाईकडून विशेष मागणी आहे. तसेच महाराष्ट्र सह महाराष्ट्राच्या बाहेर व अगदी दुबई, अमेरिका, युरोप या देशात ही मराठी वाचकांपर्यंत हे पुस्तक पोहोचले आहे. ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकास ज्येष्ठ विचारवंत, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू माजी राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी प्रस्तावना लिहिली असून लेखकाचे पाठराखण पर शब्द प्राच्यविद्यापंडित डॉ. आ ह साळुंखे यांनी लिहिले आहे. तसेच या पुस्तकाबद्दल जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, मॅक्स महाराष्ट्राचे संपादक रवींद्र आंबेकर, बीबीसीचे संपादक अभिजीत कांबळे यांच्यासह अनेक दिग्गज अभ्यासक, विचारवंत व पत्रकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर आठ दिवसातच या पुस्तकाची प्रथमावृत्ती संपली व पुस्तकाची सर्वत्र चर्चा सुरू झाली. नव्या पिढीला समजेल अशा प्रेरणादायी शब्दात हे पुस्तक लिहिल्याने तरुणाईने या पुस्तकाला विशेष पसंती दिली आहे. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमात, वाढदिवसाला, सत्कारासाठी हे पुस्तक लोक एकमेकांना भेट म्हणून देत आहेत, तसेच भीमजयंती निमित्त वितरणासाठी या पुस्तकाला आतापासूनच मोठी मागणी होऊ लागली आहे.

लवकरच हिंदी आणि इंग्रजी भाषेत आवृत्ती 

“जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाला मिळत असणारा प्रतिसाद हे बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांचे, संघर्षाचे यश आहे. नव्या पिढीचा प्रतिनिधी म्हणून त्यांना पचतील, पटतील व रूचतील अशा भाषेत बाबासाहेब सांगणे हे माझे कर्तव्य होते ते मी करत आहे व ते सर्वसमावेशक पद्धतीने सर्वांना आवडले आहे हे मला जास्त महत्वाचे वाटते. बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्याही चौकटीत बांधावे असे व्यक्तिमत्व नाही त्यांचं कार्य हे जागतिक स्तरावरील असून जगाला प्रेरणा देणारे आहे, असं आपण म्हणत असतो पण ते या पुस्तकाच्या माध्यमातून सप्रमाण वाचकांना दाखवून देण्याचा प्रयत्न मी केला आहे. हे पुस्तक जात, धर्म, प्रदेश सीमा ओलांडून सर्वव्यापी झाले तशा अनेक प्रतिक्रिया येत आहेत याचा मनस्वी आनंद वाटतो. वाचकांच्या मागणीनुसार लवकरच हिंदी आणि इंग्रजी भाषेत भाषांतरित आवृत्ती प्रकाशित करू.”

– जगदीश ओहोळ (लेखक व व्याख्याते)

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading