सुनेत्रा पवार यांची शिवसृष्टीला भेट
पुणे : आज शिवजयंतीनिमित्त शिवसृष्टीला भेट देण्याचा योग आला आणि २१ व्या शतकातून थेट १७ व्या शतकात गेल्याचा अनुभव मी घेतला. शिवसृष्टी येथे येऊन शिवरायांच्या सान्निध्यात पावन झाल्यासारखे वाटले, अशा भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केल्या. सुनेत्रा पवार यांनी आज पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने न-हे – आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’ला भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
शिवसृष्टीचे विश्वस्त जगदीश कदम, विनीत कुबेर, सुनील मुतालिक, माजी खासदार प्रदीप रावत, शिवसृष्टीचे व्यवस्थापक अनिल पवार, रुपाली चाकणकर प्रदीप गारटकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धनंजय काळे, मनोज पोचट, सत्यजित कदम, सुधीर थोरात, आंबेगाव बुद्रुकचे माजी सरपंच संतोष ताटे, उपसरपंच नाना कांढरे, माजी नगरसेवक युवराज बेलदरे आणि रहिवासी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कवड्यांची माळ, शाल, श्रीफळ देत यावेळी सुनेत्रा पवार यांचा यावेळी शिवसृष्टीच्या विश्वस्तांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवसृष्टी प्रत्यक्षात उतरविणे हा आयुष्याचा श्वास आणि ध्यास बनवला. आज येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे थीम पार्क पुढील पिढ्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास उभा करेल असा मला विश्वास आहे.
हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष असून या घटनेने आपल्या स्वराज्याला पाहिले छत्रपती आणि स्वराज्य लाभले. लोककल्याणकारी राज्याची संकल्पना महाराजांनी मांडली. समाजातील प्रत्येक घटकाची काळजी घेण्याची शिकवण त्यांनी दिली. आज महायुतीची वाटचाल याच विचारांवर सुरू आहे, याचा अभिमान आहे. महायुती जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे, असेही पवार म्हणाल्या.
यावेळी प्रास्ताविक करताना जगदीश कदम म्हणाले की, येत्या ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण होत आहे या घटनेचे औचित्य साधत शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येईल. सुमारे २१ एकर परिसरात व पाच टप्प्यात साकारणाऱ्या या प्रकल्पामध्ये तब्बल ४३८ कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. जगदीश कदम यांनी उपस्थित सर्वांना प्रकल्पाची माहितीही दिली.
