पं. जितेंद्र अभिषेकी हे कलेकरिता जीवन समर्पित करणारे व्यक्तिमत्त्व – पं सुहास व्यास
पुणे : आज कलाकार कलेवर जगण्याकरिता धडपड करीत असताना पंडित जितेंद्र अभिषेकी हे कलेकरता जीवन समर्पित करणारे असे व्यक्तिमत्त्व होते. कलेकरता जगणाऱ्या माणसांमध्ये बुवांचे स्थान खूप वरचे आहे. माझ्या सांस्कृतिक कारकीर्दीत वडिलांनंतर पंडित जितेंद्र अभिषेकी हेच माझे ‘रोल मॉडेल’ आहेत, अशा भावना ज्येष्ठ गायक पं सुहास व्यास यांनी व्यक्त केल्या.
उज्वल केसकर, आपला परिसर आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेल्या पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाच्या आजच्या पहिल्या दिवशी पं व्यास यांचा पं जितेंद्र अभिषेकी पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सदर महोत्सव संपन्न होत आहे. महोत्सवाचे हे १८ वे वर्ष असून तो सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर आणि पुणे शहराचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते संपन्न झाले.
महोत्सवाचे आयोजक आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य व सुपुत्र पं शौनक अभिषेकी, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी विरोधी पक्ष नेते उज्ज्वल केसकर, सुप्रसिद्ध तबलावादक पंडित रामदास पळसुले, पं सुहास व्यास यांच्या पत्नी अनुराधा व्यास, सुप्रसिद्ध गायिका विदुषी देवकी पंडीत, गायिका सानिया पाटणकर, गोविंद बेडेकर, बढेकर समूहाचे प्रवीण बढेकर, आपला परिसर संस्थेचे अध्यक्ष महेश पानसे, विदयेश रामदासी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावर्षी महोत्सवासाठी बढेकर गृप आणि विलास जावडेकर डेव्हलपर्स, लोकमान्य मल्टपर्पज को ऑपरेटिव्ह बँक लि., अंशुमन टेक यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
यावेळी या वर्षीचा ‘प्रथितयश गायिका पुरस्कार’ सुप्रसिद्ध गायिका सानिया पाटणकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शिवाय संगीत क्षेत्रातील कार्यक्रमांचे यशस्वीपणे संयोजन करणारे गोविंद बेडेकर यांना ‘यशस्वी संयोजक पुरस्कार’ देत तर पंडित रामदास पळसुले यांचा षष्ट्याब्दीपूर्ती निमित्त सन्मान करीत त्यांचाही गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना पंडित व्यास पुढे म्हणाले, “१९६५ सालापासून बुवांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली तेव्हापासून मी त्यांना, त्यांच्या रियाजाला पाहत आलो आहे. माझे वडील आणि बुवा हे एका गुरुंचे शिष्य होते. गुरुंची गायकी, त्यांचा विचार पुढे नेण्याचे ज्या ज्या लोकांनी काम केले त्यात अभिषेकी बुवा यांचे नाव अग्रस्थानी आहे. ”
गाणे शिकायला सुरुवात केली त्याला जी माणसं कारणीभूत झाली त्यामध्ये वडीलांव्यतिरिक्त अभिषेकी बुवा यांचा वाटा मोलाचा आहे. त्यांनी माझ्यासमोर आदर्श ठेवला. माझ्या सांगीतिक कारकिर्दी बद्दल त्यांना आत्मीयता होती. रियाजाला पर्याय नाही ही शिकवण त्यांनी दिली, असेही व्यास म्हणाले.
यावेळी बोलताना डॉ रघुनाथ माशेलकर म्हणाले, “पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी नाट्यसंगीताला भावसंगीताची जोड देऊन जणू जिवंत केले. त्यांचे हे कार्य फार मोठे आहे असे मला वाटते. अभिषेकी बुवा हे केवळ एक व्यक्ती नाहीत तर एक संस्था आहेत. व्यक्ती आपल्यामधून जातात मात्र संस्था या कायमच टिकतात. बुवा देखील संस्थेच्या याच रुपात पुढची हजारो वर्षे आपल्या सोबत असतील. अभिषेकी बुवा ते चिरंतर आहेत.”
त्यांची ‘सर्वात्मका सर्वेश्र्वरा…’ ही रचना मला आवडते. ही रचना म्हणजे परमभाव तर आहेच शिवाय नाट्य संगीतातले पसायदान आहे असे मला वाटते, असेही डॉ माशेलकर म्हणाले.
पुणे शहर हे राज्याची सांस्कृतिक राजधानी असताना शहराची ही परंपरा पुढे चालू ठेवण्यामध्ये पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवासारख्या महोत्सवांचा वाटा महत्त्वाचा आहे, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले.
यानंतर अभिषेकी बुवांनी संगीत दिलेल्या आणि गायलेल्या रचनांचे सादरीकरण असलेला ‘स्वराभिषेक’ हा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये पं जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य डॉ राजा काळे, पं जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य, सुपुत्र व सुप्रसिद्ध गायक पं. शौनक अभिषेकी, गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांचे शिष्य व सुप्रसिद्ध गायक पं. रघुनंदन पणशीकर आणि भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे शिष्य व प्रसिद्ध गायक आनंद भाटे आदी कलाकारांनी सादरीकरण केले.
यावेळी पंडित रघुनंदन पणशीकर यांनी कट्यार मधील पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी शिकविलेला तराणा प्रस्तुत केला. यानंतर त्यांनी राग रागेश्री मधील अभिषेकी बुवांची ‘मोरा मन बस करे लिनो श्याम…’ ही बंदिश व ‘गुंतता हृद्य हे…’ हे पद सादर केले. ‘नामाचा गजर’ या अभंगाने त्यांनी समारोप केला. त्यांना निखिल फाटक (तबला), पंडित सुधीर नायक (संवादिनी), ज्ञानेश्वर दुधाने ( पखावज), सौरभ काडगांवकर (गायन), शुभम खंडाळकर, राधिका जोशी (तानपुरा) अशी साथसंगत केली.
विदयेश रामदासी यांनी प्रास्ताविक केले. दीपक पवार यांनी आभार मानले तर श्रुती निगुडकर यांनी सूत्रसंचालन केले.
