इंडिया गेमिंग शो २०२४ चा पुण्यामध्ये शुभारंभ
पुणे : कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री व इंडियन डिजिटल गेमिंग सोसायटी द्वारे संयुक्तरित्या आयोजित करण्यात आलेला व इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, इन्व्हेस्ट इंडिया व मीडिया एंटरटेनमेंट स्किल काउन्सिलचे पाठबळ लाभलेला, प्रचंड उत्सुकतेचे कारण बनलेला इंडिया गेमिंग शो २०२४ महाराष्ट्रातील पुणे येथील मेस्से ग्लोबल लक्ष्मी लॉन्स येथे १४ ते १६ मार्च २०२४ दरम्यान भरत असून यात भारतासह १० देशांतील स्पर्धक सहभागी होताना दिसणार आहेत. पुण्यातून काम करणा-या सुमारे ५० गेमिंग कंपन्यांच्या साथीने विस्तारत्या गेमिंग उद्योगक्षेत्रास समोर आणणे हे पुण्यामध्ये भरविल्या गेलेल्या आयडीजीएस चे लक्ष्य आहे. या कार्यक्रमामध्ये गेमिंग उद्योगक्षेत्रातील ताज्या घडामोडी, नवे शोध आणि प्रवाह यांच्यावर प्रकाशझोत टाकण्यात येईल.
पुणे हे नवसंकल्पना आणि उद्योजकतेचे एक गतीशील व वेगाने विस्तारणारे केंद्रस्थान आहे, जे स्टार्टअप्ससाठीची आपली असाधारण यंत्रणा, इन्क्युबेटर्स, अॅक्सलरेटर्स आणि एंजल इन्व्हेस्टर्स यांचे विशाल जाळे अभिमानाने मिरवते. भारतातील काही सर्वोत्तम इंजीनिअरिंग महाविद्यालये आणि विद्यापीठे असणारे पुणे भारतीय बाजारपेठेत स्वत:ला प्रस्थापित करू पाहणाऱ्या स्टार्टअप्ससाठीचे एक निर्विवाद गंतव्यस्थान ठरत आहे.
इंडियन डिजिटल गेमिंग सोसायटी चे प्रेसिडंट श्री. राजन नवानी यांनी या आगामी कार्यक्रमाविषयी आपली उत्सुकता व्यक्त केली. ते म्हणाले, “जागतिक गेमिंग मार्केट वेगवान गतीने विस्तारत आहे आणि २०२२ साली त्याचे मूल्य युएसडी २४९.५५ बिलियन्स इतके होते, जे २०३० पर्यंत युएसडी ६६५.७७ पर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे. भारत या बाजारपेठेमध्ये एक मोठी भूमिका निभावत आहे आणि हा शो म्हणजे इथल्या बहरत्या गेमिंग कम्युनिटीचा सोहळा आहे. तरुणांचा गेम्सकडे वाढता कल हे या क्षेत्राच्या विस्ताराला चालना देणारे एक प्रमुख कारण आहे. या शोमध्ये नवीन प्रवाहांची ओळख करून दिली जाईल आणि या क्षेत्राच्या प्रचंड वेगाने होणाऱ्या वाढीमध्ये भारतीय तरुण आणि कंपन्यांचे योगदान ठळकपणे मांडले जाईल.”
हा अव्वल दर्जाचा गेमिंग इव्हेन्ट म्हणजे गेमिंग उद्योगक्षेत्राचा एक उत्साहाने भारलेला आनंदसोहळा असणार आहे, जिथे या गेम्सचे चाहते, या उद्योगक्षेत्रातील नेतृत्व आणि गेमिंगचे महारथी यांच्या एकत्र येण्यातून एक अविस्मरणीय अनुभव आकारास येणार आहे. या उद्योगक्षेत्रातील विख्यात तज्ज्ञ आणि थॉट लीडर्स यावेळी मनोवेधक कार्यशाळा आणि परिसंवाद घेणार आहेत, ज्यातून गेमिंग उद्योगातील आगामी प्रवाह, आव्हाने आणि संधी यांच्याविषयी अनमोल अशी सखोल माहिती मिळू शकणार आहे.
चर्चासत्रे आणि फायरचॅट्समध्ये भारतातील गेमिंग इन्फ्लुएन्सर्स, भारतातील ई-स्पोर्टसचे अर्थशास्त्र, सरकारी उपक्रम इत्यादी विषयांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. केवळ गेमिंगची जाहिरात करणे नव्हे तर लोकांना गेमिंग मार्केटच्या आवाक्याविषयी शिक्षित करणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. आयडीजीएस मध्ये सहभागी होणाऱ्या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, जपान, कझाकस्तान, फिलिपाइन्स, दक्षिण कोरिया, स्पेन, युनायटेड अरब अमिराती आणि रशिया यांचा समावेश असणार आहे.
उद्घाटनाच्या दिवशी ‘’कौशल्य क्षेत्रात नवीन काय आहे, आणि गेमिफिकेशनचा शिक्षण प्रणाली आणि भविष्यावर होणारा परिणाम’ हा कौशल्यांच्या क्षेत्रातील नवे प्रवाह आणि गेमिफिकेशनचा शिक्षण यंत्रणेवर व तिच्या भवितव्यावर होणाऱ्या परिणामांविषयीची चर्चा करणारा परिसंवाद होईल. भारतामध्ये अजूनही गेमिंगकडे फावल्या वेळचा छंद म्हणून पाहिले जात जाते. या टप्प्यावर या विषयावरील संवाद महत्त्वाचा आहे आणि या परिसंवादामुळे या संवादाचा सूर साधला जाईल. या सत्रामध्ये गेमिफिकेशनचा शिक्षणावर होणारा ठोस परिणाम, अधिक मनोबल आणि सातत्यास चालना देणे तसेच संकल्पनांवर हुकूमत मिळविण्याची गरज यावर भर दिला जाईलस. शिकण्याच्या प्रक्रियेला एका चित्तवेधक साहसी अनुभवामध्ये परिवर्तीत करून शिक्षणक्षेत्रातील मंडळी विद्यार्थ्यांमधील छुप्या क्षमतांना मुक्त करू शकतील आणि डिजिटल युगामध्ये सर्वोत्कृष्ट बनण्यासाठी व भरभराट साधण्यासाठी त्यांना सक्षम बनवू शकतील.
त्याचप्रमाणे, भारतीय गेमिंग इन्फ्लुएन्सर्सच्या कहाण्या सांगणारे ‘भारतातील गेमिंग इन्फ्लुएंसर इंडस्ट्रीचे अकथित सत्य’ हे सत्र देशातील गेमिंग इन्फ्लुएन्सर्सच्या विश्वाला आकार देणारे छुपे बारकावे आणि वेगाने बदलणारा पट यांवर प्रकाशझोत टाकेल. पडद्यामागच्या प्रसंगांतून दिले गेलेले ज्ञान ते कन्टेन्ट क्रिएटर्ससमोरची आव्हाने आणि त्यांच्या यशोगाथा यांचा समावेश असलेल्या या सत्राद्वारे या उद्योगक्षेत्राच्या उद्योगक्षेत्राची व्याख्या रचणाऱ्या मात्र आजवर उजेडात न आलेल्या कहाण्यांचा वेध घेतला जाईल.
भारतातील ई-स्पोर्टसचे अर्थशास्त्र उलगडून दाखविणाऱ्या, उद्घाटनाच्या दिवशी होणाऱ्या ‘भारतातील एस्पोर्ट्सचे अर्थशास्त्र’ या परिसंवादामध्ये भारतातील ई-स्पोर्टस् परिसंस्थेतील विविध घटकांच्या अर्थशास्त्राचा मागोवा घेतला जाईल; यात ब्रॅण्ड्स, तिकिट्स, मीडिया हक्क अशा सध्या कार्यरत असलेल्या चलनीकरणाच्या विविध पद्धतींवर चर्चा होईल आणि एक टिकाऊ ई- स्पोर्टस् अर्थव्यवस्था उभारण्याच्या भवितव्यावर चर्चा होईल. भारतात पीसी आणि कन्सोल गेम्सच्या भवितव्यावर चर्चा करणाऱ्या ‘भारतातील पीसी/कन्सोल गेम्सची सद्यस्थिती आणि भविष्य’ या फायरचॅटमध्ये भारतातील पीसी आणि कन्सोल गेमिंगचा गतीमान पट मांडला जाईल, जिथे जगातील सर्वात वेगाने विस्तारत्या गेमिंग मार्केट्सपैकी एक असलेल्या भारतात नवसंकल्पना आणि संधी यांची सांगड घातली जात आहे.
१५ मार्च रोजी होणाऱ्या ‘लेव्हल अप इंडिया – भारत सरकारच्या योजना, इन्व्हेस्ट इंडिया, MeitY स्टार्टअप हब, स्टार्टअप इंडिया, एसटीपीआय” या विषयावरील परिसंवादाद्वारे शोमधील सहभागींना भारत सरकारच्या नेतृत्वाखाली राबविले जाणारे धोरणात्मक उपक्रम, इन्व्हेस्ट इंडिया, MeitY स्टार्टअप हब आणि स्टार्टअप इंडिया, एसटीपीआय यांसारख्या विस्तारत्या गेमिंग उद्योगाचे सक्षमीकरण करणाऱ्या उपक्रमांची ओळख करून दिली जाईल.
या सोहळ्यामध्ये अग्रगण्य गेमिंग फर्म्सच्या वैविध्यपूर्ण दालनांची रेलचेल असेल, ज्यात नवीनतम गेमिंग अॅक्सेसरीज, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर यांचे प्रदर्शन मांडले जाईल. स्पर्धास्तरीय गेमर्सना विविध गेमिंग मंचांवरून थरारक ई-स्पोर्टस् सामन्यांमध्ये सहभागी होता येईल.
इंडिया गेमिंग शो २०२४ हे गुंतवणूकदार, विकासक, गेमर्स आणि व्यापार तज्ज्ञ यांच्यामध्ये परस्परसंपर्काचे जाळे निर्माण करणारे एक उत्तम ठिकाण आहे. इथे सहभागींना सक्रिय कम्युनिटीमध्ये नवे मैत्र जोडता येईल, भागीदारी करता येईल आणि सांघिक कामगिरी साकारता येईल. क्राफ्टन या उपक्रमाचे प्रमुख प्रायोजक आहेत.
