‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे पुरंदरमधील वन्यजीवांसाठी पाण्याची सोय
पुणे : वन्यजीवांची सेवा करणे ही भूतदया आहे, या उक्तीनुसार पुरंदर तालुक्यातील डोंगराळ भागात श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे वन्यजीवांसाठी टँकरद्वारे पाण्याची सोय उपलब्ध करुन दिली जात आहे. पुरंदर तालुक्यातील वनक्षेत्रात ऐन उन्हाळ्यात वन्यजीवांना पाण्याचे दुर्भिक्ष भासू नये, यासाठी आता चक्क मोरया म्हणजे पुण्याचा लाडका बाप्पा सरसावला आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने पुरंदर तालुक्यातील काही दुर्गम व डोंगराळ भागात वन्यजीवांसाठी पाण्याची सोय करण्यात येत आहे. परिसरातील पक्षीमित्र व सामाजिक कार्यकर्त्यांनी ट्रस्टच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. जिल्ह्यात संकट किंवा आपत्तीवेळी सदैव मदतीसाठी तत्पर असलेले दगडूशेठ गणपती ट्रस्ट अनेक गावोगावी सेवा पुरवत आहेत. ट्रस्टच्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने दुष्काळग्रस्त भागातील गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
वाल्हेसह गायकडवाडी, आंबाजीचीवाडी, मुकादमवाडी, राखनजिकची रणनवरेवाडी, चव्हाणवस्ती, पडळकरवस्ती, नावळीनजीकची दौडवस्ती, सोनवणेवस्ती, पिंगोरी, कवडेवाडी, शिंदेनगर, खोमणेवस्तीवरील ग्रामस्थांची तहान भागवली जात आहे. तसेच शिल्लक राहिलेले पाणी शेतशिवारातील तळ्यात सोडले जात आहे. त्यामुळे येथील पाळीव व वन्यजीवांच्याही पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, गतवर्षी अत्यल्प झालेल्या पावसामुळे नैसर्गिक जलस्त्रोत, पाणवठे आटले आहेत. त्यामुळे सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. डोंगर परिसरातील वन्यजीव अन्न-पाणी शोधत मानवी वस्तीकडे फिरताना अनेकदा दिसत आहेत. त्यामुळे ट्रस्टकडून पाण्याची सोय करण्यात आली आहे.पुरंदर तालुक्यातील अनेक गावांत पावसाळ्यापासूनच दोन टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच ट्रस्टकडून वन्यजीवांची सेवा केली जात आहे.
