Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

दिव्यांग शिक्षणासाठी शिक्षण विभागात स्वतंत्र संचालक हवा – बच्चू कडू

पुणे  : राज्यात दिव्यांग व्यक्तींच्या शिक्षणाची जबाबदारी शिक्षण विभागाकडे देण्याबरोबरच याच्या योग्य अंमलबजावणीकरिता या विभागाला स्वतंत्र संचालक असायला हवा अशी कल्पना महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी मांडली. संचालक नियुक्ती करताना शक्यतो सैन्य दलातील माजी अधिकाऱ्यास प्राधान्य द्यावे असेही ते यावेळी म्हणाले. दिव्यांग नागरिकांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारचा दिव्यांग कल्याण विभाग, सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्क – पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि बालकल्याण संस्था यांच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुख्य इमारतीमधील ज्ञानेश्वर सभागृहात एक दिवसीय विशेष राज्यस्तरीय कार्यशाळेचे व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बच्चू कडू बोलत होते.

बालकल्याण संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री प्रतापराव पवार, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) राजेंद्र निंभोरकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी, प्र कुलगुरु पराग काळकर, कुलसचिव विजय खरे, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज आणि अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष दीपक करंदीकर, सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्कचे महासंचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र जगदाळे, दिव्यांग कल्याण विभाग आयुक्तालयाचे उपायुक्त संजय कदम, माजी आयुक्त ओमप्रकाश देशमुख, समाजकल्याण विभागाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ दिनेश डोके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून या कार्यशाळेतील उपस्थितांना संबोधित केले. 

दिव्यांग व्यक्तींना येणाऱ्या समस्यांवर चर्चा, त्यांच्या कौशल्यविकासाच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना, त्यांनी आत्मनिर्भर व्हावे यासाठी उद्योजकतेच्या दृष्टीने प्रवृत्त करण्यासाठी चर्चासत्रे, कार्यशाळा आणि दिव्यांगांसाठी उत्पादने तयार करणाऱ्या विशेष स्टार्ट-अप सहभाग असणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजन या एकदिवसीय विशेष कार्यशाळेत करण्यात आले होते.

यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले, “आज विविध क्षेत्रात उच्च तंत्रज्ञानासंबंधी संशोधन सुरू आहे. मात्र एखाद्याला जन्मतः येऊ शकणारे कोणतेही शारीरिक अपंगत्व टाळण्यास मदत करणाऱ्या संशोधनाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. अशा संशोधनाला सर्व संबंधितांनी प्रोत्साहन द्यायला हवे. दिव्यंगत्व येऊ नये यासाठी पोलिओ लसीकरण मोहिमांसारख्या मोहिमा योग्य व शास्त्रीय पद्धतीने राबविण्यासोबतच, दिव्यंगत्व कमी करणे आणि त्याहीपुढे जाऊन दिव्यांग व्यक्तींचे पुनर्वसन करताना दर्जेदार आणि भविष्यात त्रास न होणारी उपकरणे मदत म्हणून देण्याचा सरकारचा प्रयत्न असायला हवा. याबरोबरच दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी समर्पित वृत्तीने सामुदायिक प्रयत्नांची देखील गरज आहे.”

दिव्यांग कल्याणासाठी अर्थसंकल्पात केलेल्या तरतूदीबाबत चिंता व्यक्त करीत कडू पुढे म्हणाले की, “राज्याच्या ६ लाख कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पापैकी केवळ १४०० कोटी रुपयांचीची तरतूद दिव्यांग कल्याणासाठी करण्यात आली आहे. प्रत्येक विभागाकडून ५% निधी दिव्यांग कल्याणासाठी वापरण्याची तरतूद लक्षात घेता, सुमारे ३० हजार कोटी रुपये इतकी रक्कम दिव्यांग कल्याणासाठी मिळायला हवी.”

दिव्यांग कल्याणासाठी स्वतंत्र विभागाची गरज ओळखल्याबद्दल आणि ती मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बच्चू कडू यांनी आभार मानले आणि दिव्यांग लोकांच्या कल्याणाशी संबंधित कायद्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य बनण्याची अपेक्षा व्यक्त केली.

या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रावेळी एकनाथ शिंदे हे व्हिडिओद्वारे सहभागी झाले. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, “राज्यातील सुमारे ३ टक्के लोकसंख्या ही दिव्यांग आहे. त्यांच्या कल्याणासाठी शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. दिव्यांग कल्याणासाठी स्वतंत्र विभाग असलेले महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असून दिव्यांग कल्याणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

दिव्यांगांचे जीवन चांगले करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराकडे लक्ष दिले पाहिजे. सामाजिक न्याय विभाग लवकरच सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क अर्थात एसटीपी, पुणे यांच्याशी सामंजस्य करार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यामध्ये एसटीपी एक मिशन पार्टनर म्हणून काम करेल. पुढील दोन वर्षांत तंत्रज्ञानावर आधारित दिव्यांग व्यक्ती चालवतील अशा १०० कंपन्या उभारून प्रत्येक कंपनीत १०० दिव्यांग व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे दिव्यांग कल्याणासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची घोषणा केली. हे सेंटर एसटीपी आणि एसएसपीयूच्या मदतीने व राज्य सरकारच्या दिव्यांग कल्याण विभागाद्वारे स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्राच्या निर्मितीसाठी राज्य दिव्यांग कल्याण विभाग निधी उपलब्ध करून देईल.

दिव्यांग व्यक्तींना उद्योजकतेकडे वळविण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यावर आमचा कायमच भर असेल व यासंबधी आवश्यकती सर्व मदत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून देण्यात येईल असे आश्वासन यावेळी डॉ सुरेश गोसावी यांनी दिले. 

या एक दिवसीय कार्यशाळेत ‘उद्योग आणि व्यावसायिकता’, ‘शिक्षण व कौशल्य’, क्रीडा, दिव्यांग व्यक्तींसाठी काम करतानाची ध्येय- धोरणे आदी विषयांवर समग्र चर्चा झाली. दिव्यांग व्यक्तींना उपयुक्त अशी उत्पादने बनविणारे स्टार्ट अप्स आणि दिव्यांग व्यक्तींनी इतरांसाठी बनविलेल्या उत्पादनांचे सुमारे २० स्टार्ट अप्स यांचे एक खास प्रदर्शन देखील यावेळी आयोजित करण्यात आले होते. 

संजय कदम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर मिलिंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading