संतापजनक : आंबेडकरी जनतेवर पोलिसांकडून लाठीचार्ज व अश्रु धूरांचा वापर
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खानमपूर गावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान उभारली जावी, या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून या गावातील आंबेडकरी जनता विभागीय आयुक्तालयासमोर ठिय्या मांडून बसून होती. मात्र, पाच दिवस उलटूनही त्यांच्या मागणीला कोणी प्रतिसाद देत नाहीत, हे लक्षात आल्यावर; आज या संदर्भात आयुक्तालयात बैठक सुरू असताना आंबेडकरी जनतेचा पारा सुटला व त्यांनी आयुक्तालयात जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी हजारोंच्या संख्येने निघालेल्या या जनतेला पोलिस प्रशासनाला नियंत्रणात आणता आले नाही. यावेळी पोलिसांनी आंबेडकरी जनतेवर लाठीचार्ज केला तसेच त्यांना पांगवण्यासाठी अश्रु धूरांच्या नलकांद्या देखील फोडण्यात आल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खानमपूर गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान उभारण्यावरून गावातील दोन गटांमध्ये वाद सुरू होता. दरम्यान, या वादाला कंटाळून अनेक दलित जनतेने हे गाव सोडून दुसरीकडे जाण्याचा मार्ग देखील निवडला. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी तेथे बैठक घेवून केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान न उभारता फुले, शाहू, डॉ. आंबेडकर यांची नाव असलेली कमान उभारू असा तोडगा काढला होता. यावरूनही वाद शांत झाला नाही. हा निर्णय होण्यापूर्वीच एका गटाने परस्पर कमान उभारली. त्यानंतर या कमानीला नाव काय द्यायचे? यावरून दोन्ही गटातील वाद पुन्हा पेटला.
अखेर या वादावर तोडगा काढण्यासाठी गावातील आंबेडकरी जनता ही मंत्रालयाच्या दिशेने जायला निघाली. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढत या मुद्द्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या पाच दिवसांपासून या गावातील आंबेडकरी जनता विभागीय आयुक्तालयासमोर ठिय्या मांडून बसून होती. आज जेव्हा गावातील शिष्टमंडळ आणि पोलीस अधीक्षकांची बैठक आयुक्तालयात सुरू होती; त्यावेळी आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी विभागीय आयुक्तालयात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली आणि आंदोलनाला हिंसक वळण लागले. यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सुरुवातीवला पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच आंदोलकांवर पाण्याच्या फवाऱ्याने मारा केला आहे.
