CAA कायदा देशभरात लागू: केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी
नवी दिल्ली : देशभरात आजपासून नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात CAA कायदा लागू झाला आहे. यांची अधिसूचना केंद्र सरकारने आज काढली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीचा तोंडावर केंद्रातील मोदी सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार देशभरात केंद्र सरकारकडून नागरिकत्त्व सुधारणा कायदा अर्थात सीएए लागू करण्यासंदर्भात अधिसूचना काढण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारचा हा निर्णय गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे. सीएए (CAA) कायद्यासंदर्भात केंद्राने अधिसूचना काढल्यामुळे आता या कायद्याची अंमलबजावणी होणार, ही बाब अटळ आहे. हा कायदा पाच वर्षांपूर्वी मंजूर झाला आहे, मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. परंतु, आता लोकसभा निवडणुकीचा आचारसंहिता लागू होण्यास अवघे काही तास शिल्लक असताना केंद्र सरकारने सीएए कायद्याची अधिसूचना काढली आहे.
नागरिकत्व सुधारणा कायदा अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील विशिष्ट धार्मिक समुदायातील (हिंदू, शीख, जैन, ख्रिश्चन, बौद्ध आणि पारशी) बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. मुस्लिमांचा त्यात समावेश नसल्यामुळे ही तरतूद भेदभाव करणारी असल्याचे टीकाकारांचे म्हणणे आहे.
