मल्लांच्या मिरवणुकीने उदगीरनगरी कुस्तीमय!
ढोल-ताश्यांचा दणदणाट अन् लेझीम पथकाच्या प्रात्यक्षिकाने कुस्तीपटू भारावले
उदगीर : फेटे परिधान केलेले रूबाबदार कुस्तीगीर.. ढोल-ताश्यांचा दणदणाट.. आणि लेझीम पथकाची नेत्रदीपक प्रात्यक्षिके.. अशा उत्साही वातावरणात उदगीर शहरातून कुस्तीगीरांच्या मिरवणुकीने स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ झाला. छातीचे तवे पुढे काढून चालणार्या कुस्तीपटूंच्या या मिरवणूकीने अवघी उदगीर नगरी कुस्तीमय झाल्याचा अनुभव राज्यातील तमाम कुस्तीपटूंनी अनुभवला.

क्रीडा व युवक कल्याण सेवा संचालनालयाच्या वतीने उदगीर येथील जिल्हा परिषद मैदानावर ही स्पर्धा होत आहे. सर्व दाखल कुस्तीगीरांची शहरात घोड्यावर बसवून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लातुर येथील सदानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या ढोल पथकाने व लेझीम पथकाने केलेले वादन लक्षवेधी ठरले. क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी दुरदृष्य प्रणालीव्दारे या मिरवणूकीत सहभाग घेतला. मिरवणुकीत क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्यासह कुस्तीगीर व कुस्तीप्रेमी नागरिक उपस्थित होते.
उदगीर शहरात प्रथमच स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा होत असून ३६० खेळाडु उदगीर शहरात दाखल झाले आहेत. शनिवारी (दि.९) पंच उजळणी शिबिरानंतर कुस्तीपटूंनी वजने घेण्यात आली. फ्री-स्टाईल ५७ किलो, ७० किलो, ९७ किलो, ग्रिकोरोमन ५५ किलो, ७७ किलो, १३० किलो, महिला गटाच्या ५० किलो, ५९ किलो, ७७ किलो वजनी गटाच्या लढती शनिवारी संध्याकाळच्या सत्रात रंगल्या. राज्यातील कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, अहमदनगर, जळगांव, रायगड, पिंपरी चिंचवड व यजमान लातूर संघ पदकांसाठी आखाड्यात डाव-प्रतिडावांचे कौशल्य पणाला लावताना दिसतील.
स्पर्धेसाठी ३ मॅटची कुस्ती मैदाने सज्ज झाले असून ८ हजार प्रेक्षकांसाठी गॅलरी उभी करण्यात आली आहे. शनिवारपासून सलग तीन दिवस फ्री-स्टाईल, ग्रीको रोमन व महिलांचे कुस्ती थरार पहाण्यास मिळणार आहेत. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा लांबल्याने रात्री ९ वाजता प्रत्यक्ष कुस्त्यांना प्रारंभ झाला.–
