Monday, June 15, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

आता बस झालं,तुला नक्कीच पाडणार, मोहोळ यांना भाजप कार्यकर्त्यांचा इशारा

पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार काही ठरत नाही. भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक हे नावं शर्यतीमध्ये आहेत. मात्र, उमेदवारी मिळवण्यासाठीचा खरा सामना मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक यांच्यातच प्रामुख्याने पाहायला मिळत आहे. भाजपने आपला उमेदवार ठरवण्यासाठी तब्बल चार सर्व्हे केले आहेत. अजूनही उमेदवार कोण असेल यावर एकमत झालं नाही, अशातच आता भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

कार्यकर्तेच आक्रमक झालेले दिसत आहेत. पुणे महापालिका आवारात मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. ‘स्टँडिंग दिली, महापौर दिलं, सरचिटणीस बनवलं. खासदारकी पण देणार? आता बस झालं… तुला नक्की पाडणार’ अशा आशयाचे बॅनर पुणे महानगरपालिका आवारात लावण्यात आले होते. अज्ञातांनी हे बॅनर लावले असले तरी बॅनर वर ‘कष्टाळू भाजप कार्यकर्ते’ असा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे भाजपचा अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आल्याचं चित्र दिसत आहे.

या बॅनरबाजीवर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘ निवडणुकीपूर्वी शहरातील वातावरण दूषित करण्याचा हा प्रकार आहे. अशा पद्धतीचे बॅनर झळकावून उमेदवारी देण्याबाबतच्या निर्णयात कोणताही फरक पडत नसतो. हा प्रकार बालिशपणाचा आहे. पण मी एक ठामपणे सांगू शकतो की भारतीय जनता पक्षाची ही संस्कृती नाही. हा बॅनर लावण्याचा प्रकार विरोधकांनी केला असावा, अशा पद्धतीचे बॅनर लावून एखाद्याची इमेज डगमगू शकत नाही. उमेदवारी कोणाला द्यायची हा निर्णय पक्षश्रेष्ठींचा असतो त्यामुळे असे बॅनर लावून उमेदवारी देण्यावर काहीच परिणाम होणार नाही.’ 

दुसरीकडे, समाज माध्यमांवर  ‘भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना नम्र विनंती की कृपया पुणे शहर लोकसभा मतदार संघासाठी कोथरुड भागात ला सोडून इतर कोणत्याही भागातील उमेदवार द्यावा. कोथरूडचे प्रतिनिधित्व करणारे एक कॅबिनेट मंत्री पदी आहेत. नुकत्याच राज्यसभेवर देखील एक महिला खासदार झाल्या आहेत. इतर भागातील कार्यकर्त्यांना व पक्षातील निष्ठावंताना न्याय मिळावा. पुणे शहर भागातील जनतेला खासदाराला भेटायला संपूर्ण शहर ओलांडून कोथरुडला जाणे गैरसोयीचे आहे. तेव्हा कोथरुडला कृपया पूर्ण विराम द्यावा. प्रेषक  -नितीन मुळीक भाजप सदस्य पुणे व भाजप सेवा प्रकोष्ट कार्यकारिणी सदस्य पुणे शहर व भारत तिबेट सहयोग मंच पुणे महानगर, महामंत्री. या पद्धतीचा संदेश समाज माध्यमावर फिरत आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading