महाशिवरात्री निमित्त पीएमपीएमएल कडून महत्वाच्या बसस्थानकांवरून बसेसचे नियोजन
पुणे : महाशिवरात्री निमित्त भाविकांच्या सोयीसाठी शनिवार दि. 8 मार्च रोजी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून महत्वाच्या बसस्थानकांवरून बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे. शहरातून तसेच उपनगरातून अनुक्रमे निळकंठेश्वर (रूळेगांव), बनेश्वर (नसरापूर), घोरावाडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) या ठिकाणी जाण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. या भाविकांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून खाली नमूद केलेल्या बसस्थानकांवरून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
अ.क्र. स्थानकाचे नाव मार्ग
१ कात्रज सर्पोद्यान कात्रज सर्पोद्यान ते बनेश्वर (चेलाडी फाटा पर्यंत)
२ स्वारगेट मुख्य स्थानक स्वारगेट ते निळकंठेश्वर (रूळेगांव)
३ निगडी (पवळे चौक) निगडी (पवळे चौक) ते घोरावाडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी)
१) कात्रज सर्पोद्यान येथून बनेश्वर (चेलाडी फाटा) येथे जाण्याकरिता पहिली फेरी पहाटे ०५.३० वा. असून यात्रेसाठी २ जादा क्रु व पर्यायी बसमार्ग क्रमांक ६१, २९३, २९६ व २९६-अ या मार्गांवर ११ बसेस सरासरी २० मि. वारंवारितेने उपलब्ध असणार आहेत.
२) स्वारगेट मुख्य स्थानकावरून निळकंठेश्वर (रूळेगांव) येथे जाण्याकरीता पहिली फेरी पहाटे ०३.३० वा. असून यात्रेसाठी १२ जादा क्रु व पर्यायी बसमार्ग क्रमांक ५२-अ या मार्गावर २ नियमित व जादा क्रु च्या बसेस सरासरी १५ ते २० मि. वारंवारितेने उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
३) निगडी (पवळे चौक) येथून घोरावाडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) येथे जाण्याकरीता पहिली फेरी पहाटे ०५.२० मि. असून सदर ठिकाणी जाण्याकरीता पर्यायी बसमार्ग क्रमांक ३०५, ३४१, ३४२, ३६८ व ३७१ या ०५ मार्गांवर एकूण २० बसेस सरासरी १० ते १५ मि. वारंवारितेने उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
तरी तीनही बसस्थानकांवरून उपलब्ध करून देण्यात आलेल्या बससेवेचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा असे आवाहन परिवहन महामंडळामार्फत करण्यात येत आहे.
