कलाकृतींसह कलादालनांचेही नेटवर्किंग वाढावे ज्येष्ठ चित्रकार डॉ. सुधीर पटवर्धन यांचा सल्ला
पुणे : ‘दृष्यकलांची साक्षरता वाढावी आणि सातत्याने बदलत्या कलाक्षेत्राचा आस्वाद घेणारा नवा प्रेक्षक तयार व्हावा, यासाठी कलाकृतींच्या देवाणघेवाणीसोबत कलादालनांचेही (आर्ट गॅलरीज) नेटवर्किंग वाढवावे, असा सल्ला ज्येष्ठ चित्रकार डॉ. सुधीर पटवर्धन यांनी रविवारी येथे दिला.
महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने आयोजित ‘पुणे गॅलरी ऑफ व्हिज्युअल आर्टस्’ या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. श्रीराम लागू रंग अवकाश येथे सदर कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी प्रसिद्ध चित्रकार जयंत जोशी आणि दृश्यकला सुधारक व ज्येष्ठ चित्रकार प्रा. सुधाकर चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सेंटरचे सचिव राजेश देशमुख, ज्येष्ठ चित्रकार- लेखिका माधुरी पुरंदरे हे देखील यावेळी उपस्थित होते.

डॉ. पटवर्धन पुढे म्हणाले, “पुणे आणि परिसराला चित्रकारांची मोठी परंपरा आहे. नवे चित्रकार, शिल्पकार उदयास येत आहेत. मात्र, तुलनेने त्यांचे काम मांडणारी कलादालने (आर्ट गॅलरीज) कमी आहेत. तसेच असलेली कलादालने शहराच्या एकाच भागात केंद्रित झालेली दिसतात. या पार्श्वभूमीवर, शहराच्या मध्यभागी ‘पुणे गॅलरी ऑफ व्हिज्युअल आर्टस’ सुरू होत असल्याचा आनंद वाटतो.
कलाकारांमधील देवाणघेवाण आणि संवाद यातून वाढेल. कलाकारांसह कलादालनांमध्येही संवाद वाढणे गरजेचे आहे. व्यावहारिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही दृष्टीने हा संवाद वाढावा. त्यातून नवा दृष्यसाक्षर प्रेक्षकही घडेल. कलाकृतींच्या सादरीकरणासोबत येथे कलासंबंधित इतर उपक्रमही घडावेत. येथील प्रदर्शित कलाकृतींवरील निवडक टिपणे प्रसिद्ध करावीत, मध्यवर्ती संकल्पना घेऊन प्रदर्शने मांडावीत, असा सल्लाही पटवर्धन यांनी दिला.
जयंत जोशी म्हणाले, “संगीत, रंगभूमीमध्ये अग्रेसर पुण्यात दृष्यकला चाचपडत असल्याचे चित्र या उपक्रमाच्या निमित्ताने बदलेल, असा विश्वास वाटतो. दृष्यकलेचे वैविध्य आणि आशयातील विविधताही कवितेप्रमाणे बदलत असते. कलाकाराच्या स्वभावधर्मानुसार हे वैविध्य प्रकट होत असते. कलाकार आणि कलाकृती यांच्याशी प्रेक्षकांचा दुवा जोडण्याचे कार्य या उपक्रमातून घडेल.”
चित्रकार सुधाकर चव्हाण यांनी या उपक्रमातून दृष्यसंस्कार घडावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. ‘कला आणि कारागिरीचे संस्कार शालेय अभ्यासक्रमाचा भाग म्हणून झाले, तर दृष्यकलांचा नवा प्रेक्षक सहज घडू शकतो. विदेशांमध्ये प्रत्येक शहराचे सांस्कृतिक वैशिष्ट्य दर्शवणार्या ‘टाऊन हाॅल’ची संकल्पना साकारलेली दिसते. या उपक्रमाच्या माध्यमातून पुण्याचा टाऊन हाॅल प्रत्यक्षात यावा’, अशी अपेक्षा त्यांनी मांडली.
संस्थेच्या टिळक रस्ता, हिराबाग चौकातील श्रीराम लागू रंगावकाशात आयोजित या कार्यक्रमात पुणे गॅलरी ऑफ व्हिज्युअल आर्टस् उपक्रमाचे समन्वयक प्रमोद काळे यांनी प्रास्ताविक केले. ‘दृष्यसाक्षरता वाढावी, दृष्यजाणिवा समृद्ध व्हाव्यात’, हा उद्देश असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
१२० कलाकृतींचे सादरीकरण पहिल्या टप्प्यात केल्याचे ते म्हणाले. नजिकच्या काळात लहान मुलांसाठीचे उपक्रम तसेच दृष्यकलांविषयीची व्याख्याने, चर्चासत्रे होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
सेंटरचे सचिव राजेश देशमुख म्हणाले, “या प्रदर्शनात चित्रे, रेखाटने, छायाचित्रे आणि शिल्पे यांचा समावेश आहे. सुधीर पटवर्धन, सुहास बहुळकर, भास्कर हांडे, जयंत जोशी, सतीश पाकणीकर, मिलिंद ढेरे, संदेश भंडारे, सुधाकर चव्हाण अशा अनेक ज्येष्ठांपासून कित्येक कलाकारांनी आपापली कामे आम्हाला सुपूर्द केली आहेत.” विक्रम मराठे यांनी आभार मानले. उत्तरार्धात उत्तर पेशवाई काळातील चित्रकार गंगाराम तांबट यांच्यासंबंधीचे दृकश्राव्य सादरीकरण चित्रकार नितीन हडप आणि मकरंद सप्रे यांनी केले.
