मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात संपन्न
पुणे, २६ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी विभागातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन सत्रात झालेल्या या कार्यक्रमातील पहिल्या सत्रात मंगळावीर सकाळी मराठी विभाग ते मुख्य इमारतीपर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. या दिंडीचे उद्धाटन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.(डॉ) पराग काळकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी कुलसचिव प्रा.(डॉ) विजय खरे यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. धोंडीराम पवार, गुणवत्ता सुधार केंद्राचे संचालक प्रा. संजय ढोले, पाली विभाग प्रमुख प्रा. महेश देवकर, हिंदी विभाग प्रमुख प्रा. विजयकुमार रोडे, संस्कृत विभाग प्रमुख प्रा. देवनाथ त्रिपाठी, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. चंद्राणी चटर्जी, मराठी विभाग प्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात मराठी काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी विभागाच्या प्रांगणात आयोजित या काव्य संमेलनाची सुरूवात संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी श्री. वाहरू सोनवणे यांच्या पावरा या आदिवासी बोलीतील कवितेने झाली. यावेळी बोलताना, माझ्यासारख्या चळवळीच्या माणसांना समाजातील दुःख, व्यथा जास्त खोलात जाऊन कळतात, त्यामुळे हे सर्व कवितेच्या माध्यमातून समाजासमोर आणता येत असल्याचे श्री. वाहरू सोनवणे म्हणाले. यानंतर विद्यापीठातील आरोग्य अधिकारी डॉ. शशीकांत दूधगावकर यांनी ‘ओसाड गाव’ ही कविता सादर करत लोकांनी कामासाठी शहरात स्थलांतर केल्यानंतर सुन पडलेल्या गावाची कहाणी कवितेच्या माध्यमातून सांगितली. कोरोनातील भीषण परिस्थिती जवळून पाहिल्यानंतर आपण आपल्या भावना शब्दात व्यक्त करायला हव्या, असं वाटल आणि माझ्यातला कवी जागा झाला, असे ते यावेळी म्हणाले. अहमदनगरमधील कवी श्री. दशरथ शिंदे यांनी शाळेत जाणाऱ्या मुलीच्या आयुष्यावरील ‘बाई शाळच्या ग दारी’ ही कविता सादर केली. पुण्यातील प्रसिद्ध कवयित्री श्रीमती. योजना यादव यांनी भाषेला, शब्दाला किती धार असते, ती जर नकारात्मक गोष्टींसाठी वापरली तर ती विसंवादाच माध्यम होऊ शकते असे म्हणत सोशल मिडियावर होत असलेल्या ट्रोलिंगवर कविता सादर केली. नारायणगावचे श्री. अनिल साबळे यांनी आश्रमशाळेतील मुलांची व्यथा मांडणारी कविता सादर करत आश्रमशाळेतील भीषण वास्तव्य सांगणारे काही किस्सेही यावेळी सांगितले. तर अकोलेमधील कवयित्री श्रीमती. सीता भोजने यांनी ‘बोली’ ही कविता सादर केली. संत बहिनाबाई यांच्या शैलीत कविता सादर करून श्रीमती. भोजने यांनी उपस्थितांची मने जिंकली. या काव्य संमेलनाला विद्यार्थ्यी आणि काव्य रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
