मुंबई दिल्ली महामार्गाला ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य महामार्ग’ नाव द्यावे
- शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांची मागणी ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रस्ताव सादर
पुणे : नव्याने तयार होत असलेल्या मुंबई दिल्ली महामार्गाला ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य महामार्ग’ नाव देण्यात यावे, अशी मागणी शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी केंद्रीय रस्ते, परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पुण्यात निवेदन देऊन केली आहे.
विश्ववंदनीय युग प्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षाचे औचित्य साधत भारत सरकारच्या वतीने संपुर्ण देशात तसेच विश्वभर शिवराज्याभिषेक दिन संस्मरणीय करण्यासाठी शिवजयंती महोत्सव समिती, पुणेचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी ५ प्रमुख प्रस्ताव देखील नितीन गडकरी यांना सादर केले. यावेळी माजी खासदार प्रदीप रावत, समितीचे रवींद्र कंक, शंकर कडू, गोपी पवार, ईशान गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी नितीन गडकरी म्हणाले, समितीने केलेल्या या सर्व मागण्या अतिशय योग्य असून ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षात शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाला देशविदेशात पोहचवण्यात याने मदत होईल. देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर चर्चा करुन लवकरच या बाबतीत सकारात्मक निर्णय घेऊ.
अमित गायकवाड म्हणाले, या प्रस्तावामध्ये नव्याने तयार होत असलेल्या मुंबई दिल्ली महामार्गाला ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य महामार्ग’ नाव देण्यात यावे. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन ६ जून ‘राष्ट्रीय शिवस्वराज्य दिन’ जाहीर करावा. शिवराज्याभिषेकाचे टपाल तिकीट काढून त्याचे प्रकाशन राजभवनामध्ये महामहिम राष्ट्रपतींच्या शुभहस्ते करावे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिवराज्याभिषेकाच्या वेळी निर्माण केलेल्या सुवर्णहोनांची प्रतीकृती असेलेल्या नाण्यांची निर्मीती करुन त्यांचे अनावरण राजभवनमध्ये महामहिम राष्ट्रपतींच्या शुभ हस्ते करावे. ‘एव्हरेस्ट पार भगवा स्वराज्य ध्वज’ या मोहिमेची आखणी करुन पांच एव्हरेस्ट वीरांच्या हस्ते भारत चा तिरंगा आणि भगवा स्वराज्यध्वज एव्हरेस्टवर फडकवणे, अशा मागण्या प्रस्तावात आहेत.
ते पुढे म्हणाले, शिवरायांना राष्ट्रीय मानवंदना देण्यासाठी ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षासारखे दुसरे औचित्य नाही. युगप्रवर्तक शिवरायांना राष्ट्रीय स्तरावर मानवंदना देण्यामध्ये आपण सर्वजण कमी पडत आहोत. या मागण्या भारत सरकारने मान्य केल्याने खऱ्या अर्थाने शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाला राष्ट्रीय स्तरावर मानवंदना देण्याचा हेतू अंशतः तरी साध्य होईल, असेही त्यांनी सांगितले.
