१९९३ च्या मुंबई साखळी स्फोटातील अब्दुल करीम टुंडाची सुटका
अजमेर : अयोध्येत बाबरी पाडल्यानंतर १९९३ मध्ये देशभरात मुंबईसह सहा ठिकाणी रेल्वेमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. यातील एक आरोपी अब्दुल करीम टुंडा याची अजमेरच्या टाडा कोर्टाने सुटका केली. अन्य दोन आरोपी इरफान आणि हमीदुद्दीन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
१९९३ मध्ये कोटा, लखनऊ, कानपूर, हैदराबाद, सूरत आणि मुंबई या शहरांमधील रेल्वेमध्ये साखळी बॉम्पस्फोट झाले होते. या प्रकरणावरील सुनावणीवर सरकारी वकीलांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, टुंडा याची कुठल्या कारणांमुळे सुटका झाली, यावर निकालाचे वाचन केल्यानंतर टिप्पणी करता येईल.
मुंबई बॉम्ब स्फोटात सहभागी होण्यापूर्वी टुंडाने जालीस अन्सारीसोबत मुंबईत मुस्लीम समुदायासाठी काम करण्याच्या उद्देशाने ‘तंजीम इस्लाह उल मुस्लीमीन’ नावाची संस्था स्थापन केली होती. मध्य दिल्लीच्या दरियागंजमध्ये छत्ता लाल मिया भागात एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या टुंडाने आपल्या वडिलांचे गाव गाझियाबादमध्ये सुतारकाम सुरु केले होते. त्याने भंगार व्यवसायही केला. ८०च्या दशकात पाकिस्तानी गुप्तचर एजन्सी आयएसआयच्या एजंट्सच्या माध्यमातून तो लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला.
