Monday, June 1, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मनोज जरांगे यांच्या उमेदवारीला स्वाभिमानी पक्षाकडून पाठिंबा जाहीर

 

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून इंडिपेन्डंट कॅन्डिडेट म्हणून उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास आघाडीकडे करण्यात आली आहे.

त्यानंतर आता राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देखील मनोज जरांगे पाटील यांना लोकसभा निवडणुकीची ऑफर देण्यात आली आहे. स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टींप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांनी देखील लोकसभेची निवडणूक लढवावी, असे ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी म्हटले आहे.

शेतक-यांच्या प्रश्नासाठी आयुष्यभर राजू शेट्टी यांनी ज्या पद्धतीने रस्त्यावर येऊन संघर्ष केला व संसदेत जाऊन शेतक-यांच्या हिताचे निर्णय घ्यायला सत्ताधा-यांना भाग पाडले. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आणि बहुजन समाजाच्या हितासाठी रस्त्यावरच्या लढाईबरोबर कायदेमंडळात जाऊन मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडायचे असल्यास त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवायला हवी. जालना मतदार संघातून ते लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवत असतील तर स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे संदीप जगताप यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्या देशात लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये जन आंदोलन उभे करून सरकारला जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायला भाग पाडता येते. आजपर्यंत अनेक जन आंदोलनांनी जनतेच्या हिताचे निर्णय सरकारला घ्यायला भाग पाडले आहेत. परंतु या जन आंदोलनातले काही लोकप्रतिनिधी हे जर कायदेमंडळात असतील तर त्या आंदोलनाला अधिक धार येते. कमी संघर्षामध्ये, रक्त न सांडता जनतेचे म्हणणे सरकारकडून मान्य करून घेता येते.
आज मनोज जरांगे पाटील हे मराठा बहुजनांचे नेते म्हणून लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहेत. रस्त्यावर त्यांनी उभा केलेला मराठा आरक्षणाचा लढा हा अलौकिक आहे.

परंतु या लढ्याला आजही पूर्ण यश मिळाले नाही. कायदेमंडळात नवीन कायदा झाल्याशिवाय मराठा समाजाला कायमचे टिकणारे आणि योग्य आरक्षण मिळणे अशक्य आहे. यासाठी कायदेमंडळामध्ये मनोज जरांगे पाटलांसारखा प्रतिनिधी असायला हवा, असे आमचे प्रामाणिक मत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी कुठल्याही आघाडीत न जाता स्वतंत्रपणे समाजाच्या ताकदीवर लोकसभेची निवडणूक लढवावी, असे संदीप जगताप यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading