गॅस दरवाढीचा हॉटेल व्यवसायाला फटका; खाद्यपदार्थ 20 टक्क्यांनी महागण्याची शक्यता
पुणे : व्यावसायिक गॅसच्या दरातील सातत्याने होत असलेली वाढ, तसेच पालेभाज्या आणि चिकनच्या वाढत्या किमतींमुळे पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल व्यवसाय अडचणीत सापडला आहे. वाढत्या खर्चाचा भार सहन करणे कठीण झाल्याने हॉटेल व्यावसायिक खाद्यपदार्थांच्या दरात सुमारे 20 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याच्या विचारात आहेत.
हॉटेल व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, गॅस टंचाई आणि दरवाढीमुळे गेल्या काही काळात परिसरातील सुमारे 15 टक्के लहान-मोठी हॉटेल्स बंद पडली आहेत. उर्वरित हॉटेल्सनाही वाढत्या खर्चामुळे आर्थिक ताण सहन करावा लागत आहे.
गॅस, भाजीपाला आणि मांसाहारी पदार्थांच्या कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतींमुळे व्यवसाय टिकवणे अवघड होत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ग्राहकांवरही दरवाढीचा भार पडण्याची शक्यता असून, लवकरच अनेक खाद्यपदार्थ महाग होण्याची चिन्हे दिसत आहेत.
