विधान परिषद उमेदवारीवरून राष्ट्रवादीत नाराजीनाट्य
पुणे : पुणे विधान परिषद उमेदवारीच्या मुद्द्यावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विक्रम काकडे यांना उमेदवारी दिल्याच्या निर्णयाविरोधात पर्वती मतदारसंघाचे अध्यक्ष रामदास गाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
गाडे यांनी पक्षातील निष्ठावंत नेत्यांना संधी देण्याची मागणी करत दीपक मानकर आणि सुनील टिंगरे यांच्या नावांचा उल्लेख केला. पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये असंतोष असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, पूर्वी पक्षाला धक्का देणाऱ्या व्यक्तींना महत्त्व का दिले जात आहे, असा सवालही त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे उपस्थित केला.
दरम्यान, विक्रम काकडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून सुनील टिंगरे यांनीही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असली तरी पक्षश्रेष्ठींनी विक्रम काकडे यांच्या उमेदवारीला पाठिंबा कायम ठेवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी अधिकच चर्चेत आली आहे.
