Monday, June 1, 2026
Latest NewsPUNE

मराठी भाषा आधुनिक करायची की अभिजात’ डॉ. मिलिंद मालशे यांचा सवाल

पुणे – ‘मराठी अभिजात करायची की आधुनिक करायची, यापेक्षा मराठी ज्ञानभाषा होणे अगत्याचे आहे. काळानुरूप आपल्याला पुढे जायचे की मागे, हे नेमके ठरवण्याची वेळ आली आहे. अभिजात दर्जा, ज्ञानभाषा हे त्याविना केवळ बुडबुडे आहेत. बदलत जाणार्या भाषेत, संगणकीकरणाच्या प्रक्रियेत अधिकाधिक मराठीत लेखन होणे आवश्यक आहे, असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ  भाषातज्ज्ञ् , समीक्षक व लेखक डॉ. मिलिंद मालशे यांनी मंगळवारी येथे केले. ‘आधुनिक काळात डिजिटल ह्यूमनिटीज ही स्वतंत्र ज्ञानशाखा निर्माण झाली आहे. त्याला अनुसरत वैद्यकीय, अभियांत्रिकीचे शिक्षण आपल्याला आता भारतीय भाषांमध्ये द्यायचे आहे’, याची जाणीवही त्यांनी करून दिली.

महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘म. सा. पत्रिका’ या वाड्मयीन नियतकालिकातील विसाव्या शतकातील निवडक लेखांचे संकलन असलेल्या ‘अक्षरधन : निवडक महाराष्ट्र साहित्य पत्रिका विसावे शतक’ या १००० पृष्ठांच्या  बृह्द ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संशोधन विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून डॉ. मालशे यांच्या हस्ते संपन्न झाले. ग्रंथाच्या संपादक डॉ. नीलिमा गुंडी, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ग्रंथासाठी अर्थसाहाय्य करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका डॉ. नलिनी गुजराथी आणि उद्योजक मोहन गुजराथी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा समारंभ पार पडला.

याप्रसंगी डॉ. मालशे यांनी मराठी भाषेची सद्यस्थिती, शासकीय पातळीवरील भाषा कारभारावर भाष्य केले. ‘लिप्यंतर म्हणजेच भाषांतर, असा सरकारचा समज झाला आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये अशी पुस्तके आहेत. महाराष्ट्रात पण वेगळी परिस्थिती नाही. भाषेच्या संदर्भात अडाणी कारभार आहे, असे ते म्हणाले.

‘मराठी ज्ञानभाषा होणार, हा बुडबुडा आहे. अभिजात भाषा हा अजून एक बुडबुडा आहे. मागे जायचे आहे की पुढे? अभिजाततेचा आधुनिकतेशी काय संबंध आहे? मराठीचे किती प्रमाणीकरण करावे, करावे की नाही, कसे करावे, असे अनेक संभ्रम आहेत. बोली भाषा म्हणजे टाकाऊ, त्यांना व्याकरण नाही, पुरेसा शब्दसंग्रह नाही, असा गैरसमज दिसतो. तो दूर केला पाहिजे. बोलीभाषांनाही त्यांचे व्याकरण, शब्दसंग्रह, वाक्यरचना असतेच त्यामुळे त्याचे नियम असतातच. आपल्याला त्यांचा अभ्यास करायचा नसतो, हा मुद्दा आहे. आधुनिक काळात संगणकीकरणाच्या प्रक्रियेवर मराठीत अधिक लेखन व्हायला हवे, ही प्राधान्याची बाब आहे. शब्दांचे अर्थ बदलत असतात, त्यामुळे कायमस्वरूपी असे कोश तयार होणार नाहीत. त्याच्या दरवेळी नवीन आवृत्त्या निघाव्यात, हे योग्य आहे. संस्थात्मक कार्याला एक साचलेपण आलेले दिसते, ते बदलायला हवे कारण भाषा बदलत असते, असेही त्यांनी सांगितले.

ग्रंथाच्या संपादक डॉ. गुंडी म्हणाल्या,’  ‘अक्षरधन ‘ मधून  वाङ्मयीन निष्ठेने प्रबोधनपर्व  पेलून धरणारा सामूहिक स्वर ऐकू येतो. यातील लेखांमध्ये भाषा आणि वाङ्मययाविषयी अभ्यास, आस्था आणि दूरदृष्टी आढळते .आपल्या साहित्य- परंपरेतील वळणवाटांचे अर्करूप दर्शनही यातून घडते. मसाप पत्रिकेची निर्मिती साहित्यिक बंधुभाव जोपासण्यातून झाली. त्यातून वाङ्मयीन संस्कृतीची पायाभरणी व्हावी, यासाठी उर्जा मिळाली. मसाप पत्रिकेचे हे मोलाचे कार्य या निवडक लेखांच्या संकलनातून भाषा हा वाड्मयीन संस्कृतीचा प्राण असल्याचे अधोरेखित होते. अभ्यासकांसाठी संदर्भग्रंथ तर शासनकर्त्यांना भाषाविषयक धोरणे आखण्यासाठी मर्मदृष्टी देणारा हा ग्रंथ आहे’.

अध्यक्षीय समारोप करताना प्रा. जोशी म्हणाले, ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ हे परिषदेचे वाडमयीन नियतकालिक संस्थेच्या सर्वसमावेशक विचारसरणीचा वारसा जपणारे आहे. १९२८ पासून पत्रिका ‘त्रैमासिक’ या स्वरूपात स्वतंत्रपणे सुरू झाली. सुरुवातीला पत्रिकेचे स्वरूप मुख्यतः साहित्यिक तत्त्वचर्चा, भाषा व संशोधन यांना स्थान देणारे होते. त्यात कालानुरूप बदल होत गेले. यातील लेखन वाङ्मयीन संस्कृतीसाठी भरीव योगदान देणारे आहे. मात्र यातील निवडक लेखांचा खंड आजवर प्रकाशित झाला नसल्याने हे कार्य दुर्लक्षित राहिले होते. ‘अक्षरधन’ मुळे पत्रिकेचे हे योगदान प्रकाशझोतात येत आहे. या ग्रंथाची व्याप्ती आणि खोली लक्षात घेता मराठी वाङ्मय व्यवहार याचे स्वागत करील. परिषदेच्या अंर्तगत नूतनीकरणाबरोबरच हा महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्प पूर्ण झाला याचे कार्यकारी मंडळाला समाधान आहे. समाजाच्या अस्मितांवर स्वार होणे टाळले पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत आपला अंत:स्वर जागृत ठेवणे, याची आज गरज आहे. गुणवत्तेचे सपाटीकरण झाल्याचे आणि ज्ञानसत्तेचा दरारा कमी झाल्याचे चित्र खेदकारी आहे, असेही ते म्हणाले.

ग्रंथासाठी अर्थसाह्य करणार्या शिक्षणतज्ञ नलिनी गुजराती म्हणाल्या, मराठी भाषेसाठी खर्या अर्थाने काही करायचे तर शिक्षण प्रक्रियेत मराठी अनिवार्य करणे गरजेचे आहे. पहिली ते बारावीपर्यंत मराठी उच्च दर्जाने सर्व शिक्षणक्षेत्रात अनिवार्य करणे आणि मराठीतील गुण मुख्य परीक्षेतील गुणांमध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे. सध्या सगळीकडे मराठी पर्यायी स्वरुपात आहे, हे चित्र त्वरित बदलले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

मसापच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. दीपाली दातार यांनी सूत्रसंचालन केले. ग्रंथनिर्मितीत योगदान देणार्या प्रदीप अमृता खेतमर, आरती देवगावकर यांचा सत्कार करण्यात आला.

 

ग्रंथाची वैशिष्ट्ये

एक हजारपेक्षा अधिक पृष्ठे

एकूण सात विभाग

प्रत्येक विभागाला स्वतंत्र प्रस्तावना

एकूण विविध विषयतज्ञांचे तब्बल ८१ लेख

भाषा, व्याकरण, छंदःशास्त्र, व्यक्तिवेधपर लेख, साहित्यविश्वातील विविध चळवळी, प्रवाह यांची चर्चा, वाद, महत्त्वाच्या पुस्तकांची प्रदीर्घ परीक्षणे, मुलाखती, संशोधने, इतकेच नव्हे तर परभाषेतील महत्त्वाच्या कलाकृतींची दखल घेणारे लेख, असे विविधांगी लेखन समाविष्ट

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading