विषारी दारूकांड प्रकरणी तीन पोलिस अधिकारी निलंबित; मृतांचा आकडा 22 वर
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि हडपसर परिसरात घडलेल्या विषारी दारूकांड प्रकरणात मृतांची संख्या १४ वर पोहोचली असून या घटनेनंतर पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अवैध दारूविक्री रोखण्यात झालेल्या कथित निष्काळजीपणामुळे पुणे शहर पोलिस दलातील तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, हडपसर पोलीस चौकीच्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार आणि गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
फुगेवाडी परिसरात विषारी दारू सेवनामुळे सुरुवातीला आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर हडपसरमध्येही काही जणांचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढली. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात आठ आरोपींना अटक केली असून तपास वेगाने सुरू आहे.
अवैध दारूविक्रीबाबत माहिती उपलब्ध असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी प्रभावी कारवाई केली नाही, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या गंभीर घटनेमुळे पोलिस दलाच्या प्रतिमेलाही धक्का बसल्याचे मानले जात असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
