Monday, June 1, 2026
Latest NewsPUNE

ओढ्यांच्या सीमा भिंतींसाठी २०० कोटींचा विशेष निधी

– मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश
– ⁠शहरातील नाल्यांच्या सीमा भिंतींचा प्रश्न सुटणार

पुणे : शहरातील पूरस्थिती नियंत्रणासाठी नाले आणि सीमा भिंती उभारणे, या अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी राज्य सरकारने तब्बल २०० कोटी रुपयांचा विशेष निधी पुणे महापालिकेस उपलब्ध करुन दिला आहे. या संदर्भात विशेष निधी मिळावा, यासाठी मा. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. त्यावर तातडीने निर्णय घेत हा निधी उपलब्ध करुन दिला आहे. शिवाय संदर्भातील शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे.

पुणे शहरातील नाल्यांची कामे आणि सीमा भिंती बांधणे यासाठी महापालिकेचा निधी तांत्रिक अडचणींमुळे खर्च करता येत नव्हता. त्यामुळे सीमा भिंतींची कामे रखडली होती. नाला परिसरातील नागरिकांमध्ये पाऊस काळात चिंतेचे वातावरण होते. म्हणून या कामासाठी राज्य सरकारच्या विशेष निधीची आवश्यकता होती.

मोहोळ यांनी फडणवीस यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पाठपुरावा करुन ‘महापालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद’ या अंतर्गत २०० कोटी रुपये मंजूर करुन घेतले आहेत. उपलब्ध झालेल्या निधीमुळे शहरातील नाल्यांच्या कडेने संरक्षण/सीमा भिंती बांधल्या जाणार असून विशेषतः आंबील ओढा परिसराला याचा मोठा फायदा होणार आहे. या सीमा भिंतींमुळे पूरपरिस्थितीत पाणी प्रवाही राहण्यास मदत होणार आहे.

मोहोळ म्हणाले, ‘कमी वेळेत अधिक पाऊस झाल्याने २०१९ साली आंबिल ओढा परिसरात दुदैवी घटना घडली, त्यात वित्त आणि मनुष्यहानी झाली. असा प्रकार टाळण्यासाठी सीमा भिंतींची कामे महत्त्वाची ठरणार होती. त्यासाठी आपल्या पाठपुराव्यामुळे निधी उपलब्ध झाला, याचे नक्कीच समाधान आहे. देवेंद्रजींचे पुणे शहराकडे विशेष लक्ष असल्याचे या निधीच्या मंजुरीमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे’

‘हा निधी मंजूर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचे पुणेकरांच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद’, असेही मोहोळ म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading