Tuesday, June 2, 2026
Latest NewsPUNE

दिवाळी अंकांची  चळवळ अधिक समृद्ध व्हावी – डॉ. मोहन आगाशे 

पुणेः- अनेक थोर साहित्यिकांचे पहिले लेखन हे दिवाळी अंकांमधूनच प्रसिद्ध झालेले आहे. नवोदित आणि प्रस्थापित लेखकांसाठी हक्काचे व्यासपीठ असलेल्या दिवाळी अंकांची  चळवळ अधिक समृद्ध व्हावी, अशी अपेक्षा ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र साहित्य परिषद आणि पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या  दिवाळी अंक स्पर्धेतील  ‘पुण्यभूषण सर्वोत्तम दिवाळी अंकाचा’ पुरस्कार ‘हंस’ या दिवाळी अंकाला आज साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर आणि ख्यातनाम अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते  प्रदान करण्यात आला, त्यावेळी डॉ. मोहन आगाशे बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, संजय भास्कर जोशी आणि वि. दा. पिंगळे उपस्थित होते. पुण्यभूषण उत्कृष्ट दिवाळी अंकाचा ‘बालकुमार’ दिवाळी अंकासाठीचा पुरस्कार ‘वयम’ या दिवाळी अंकाला, एकाच विषयाला वाहिलेल्या दिवाळी अंकासाठीचा पुरस्कार ‘किल्ला’ या दिवाळी अंकाला तर इतर विभागातील पुरस्कार ‘चांगुलपणाची चळवळ’ या दिवाळी अंकाला प्रदान करण्यात आला.

डॉ. मोहन आगाशे म्हणाले की, सर्वसाधारणपणे लेखन या वर्गवारीत जे मोडते, त्याला साहित्य संबोधले जाते. आयुष्यात केवळ नशीबाने काही मिळत नाही, तर नशिबाला कष्टांची जोड देणे आवश्यक असते.

श्याम मनोहर म्हणाले, सगळेच रस्ते फ्रॅक्चर झाले आहेत. आपल्याकडे रिसर्च खूप होतोय पण सर्च होत नाही हे आजचे वास्तव आहे. उद्याच्या समृद्ध समाजासाठी सामान्य माणसाने कुतूहल जागे ठेवायला हवे आणि आपल्या प्रश्नांतून बुद्धिवंताच्या बुद्धीला ताण द्यायला हवा.

प्रा.मिलिंद जोशी म्हणाले की, आपणच निर्माण केलेला साचा मोडल्याशिवाय नवे काही निर्माण करता येत नाही. वर्षानुवर्षे त्याच त्या साचामुळे दिवाळी अंकांना आलेले साचलेपण दूर करणे गरजेचे आहे. ज्ञानलालसा आणि जिज्ञासू वृत्ती क्षीण होणे हे समाजाच्या बौद्धिक अधोगतीचे लक्षण आहे. समाजाच्या नैतिक आणि भौतिक जीवनातील दरी रुंदावत आहे त्यामुळे सांस्कृतिक मांद्य वाढते आहे ते दूर होण्यासाठी संवेदनशीलता वाढणे गरजेचे आहे. वैचारिक मोकळेपणा आणि लवचिकता ही दिवाळी अंकांची वैशिष्ट्ये समाजमनात उतरायला हवी.

डॉ. सतीश देसाई यांनी पुण्यभूषण फाउंडेशनची माहिती देऊन दिवाळी अंकांना पुरस्कार देण्यामागील भूमिका विशद केली.  संजय भास्कर जोशी, अभिराम अंतरकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिताराजे पवार यांनी केले. सूत्रसंचालन वि.दा. पिंगळे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading