पवना व चासकमान प्रकल्पातून २.९२ टी.एम.सी पाणी
पुणे : पवना व चासकमान प्रकल्पांमध्ये गतवर्षीप्रमाणेच पुरेसा पाणीसाठा आहे. पवना प्रकल्पात ४.८९ टी.एम.सी. पाणीसाठा आहे. त्यापैकी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस पिण्यासाठी १५ जुलैपर्यंत २.९२ टी.एम.सी., औद्योगिक व इतर खासगी संस्थांना ०.४६ टी.एम.सी. असा बिगर सिंचनासाठी देण्यात येणार आहे. सिंचनासाठी उन्हाळी हंगामात ०.२५ टी.एम.सी. पाणी सोडण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पाणी नियोजना संदर्भात बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. अजित पवार म्हणाले, चासकमान प्रकल्पातही चासकमान व कळमोडी धरण मिळून एकूण ५.२५ टी.एम.सी. उपयुक्त पाणीसाठा असून त्यापैकी वहनक्षय, बाष्पीभवन व्यय वगळता उन्हाळी हंगामासाठी ३.६३ टी.एम.सी. पाणी सिंचन व बिगर सिंचनासाठी उपलब्ध आहे. पिण्यासाठी ०.१३ टी.एम.सी. आणि सिंचनासाठी ३.५ टी.एम.सी. पाणी देण्यात येणार आहे. त्यातून सिंचनासाठी दोन आवर्तने देण्याचे नियोजन असून पहिले उन्हाळी आवर्तन ५ मार्चपासून ९ एप्रिलपर्यंत तर पुढील आवर्तन १० एप्रिल ते १५ मे किंवा लोकप्रतिनिधींच्या मागणीप्रमाणे द्यावे, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
भामा आसखेडमध्येही समाधानकारक पाणीसाठा असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला १ टी.एम.सी., सिंचन व बिगर सिंचनासाठी २.०२ टी.एम.सी. पाणी उपलब्ध असून जलाशयातून उपसा ०.०७ टी.एम.सी. आणि धरणाच्या खालील नदी व कोल्हापूर पद्धतीचे बंधाऱ्यांसाठी १.९५ टी.एम.सी. पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भामा व भिमा नदीत पहिले आवर्तन १ मार्च ते १६ मार्च व पुढील आवर्तन २० एप्रिलपासून सोडण्याचे नियोजन असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले.
यावेळी अधीक्षक अभियंता श्रीमती जगताप, कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे, श्रीकृष्ण गुंजाळ, शिवाजी जाधव, दिगंबर डुबल व महेश कानेटकर यांनी सादरीकरणाद्वारे प्रकल्पातील पाणीसाठा तसेच नियोजनाची माहिती दिली.
