Monday, June 1, 2026
Latest NewsPUNE

योग करीत असताना शारीरिक प्रयत्नांसोबतच समर्पण भाव महत्त्वाचा – योगगुरु डॉ. एच आर नागेंद्र

पुणे : आज योग या विषयावर देशात भरीव काम होत आहे. मोठ्या प्रमाणात युवक युवती हे योग या प्रकाराकडे वळत आहेत. केवळ आसने, प्राणायाम आणि क्रिया म्हणजे योग नसून योग ही संपूर्ण वेगळी जीवनपद्धती असल्याचे आता जगानेही मान्य केले आहे. मात्र, योग करीत असताना शारीरिक प्रयत्नांसोबत समर्पण भाव देखील महत्त्वाचा असल्याचे मत विवेकानंद योग अनुसंधान संस्थान अर्थात एस-व्यासा विद्यापिठाचे कुलपती योगगुरु डॉ. एच आर नागेंद्र यांनी व्यक्त केले.

पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या वतीने आजपासून सुरु झालेल्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय योग परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. नागेंद्र बोलत होते. महाराष्ट्रीय मंडळाच्या शतक महोत्सवी सोहळ्याचा भाग म्हणून या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून आज परिषदेचे औपचारिक उद्घाटन संपन्न झाले.

डॉ. एच आर नागेंद्र यांनी बंगळुरू विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी), बंगलोर येथून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पीएचडी प्राप्त केली. नंतर तेथील मेकॅनिकल विभागात प्राध्यापक म्हणून काम पाहिले. याबरोबरच कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठात पोस्ट-डॉक्टरल रिसर्च फेलो, अमेरिकेतील नासा मार्शल स्पेस फ्लाइट सेंटर येथे पोस्ट-डॉक्टरल रिसर्च असोसिएट, अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधील सायन्स लॅबोरेटरी येथे सल्लागार आणि इंपीरियल कॉलेज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, लंडन येथे व्हिजिटिंग स्टाफ म्हणूनही त्यांनी काम पाहिले. यानंतर डॉ. एच आर नागेंद्र यांनी १९७५ साली कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राच्या प्रशिक्षण केंद्राचे मानद संचालक म्हणून काम सुरु केले. १९८६ पर्यंत विवेकानंद केंद्र योग चिकित्सा आणि संशोधन समितीचे सचिव म्हणून ते कार्यरत होते. २००० सालापर्यंत विवेकानंद केंद्राचे अखिल भारतीय उपाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली याशिवाय जगभरात योगगुरू म्हणून त्यांची ओळख आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ सॅलुटोजेनेसिस अँड कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन (आयएससीएम)चे संचालक व पाँडिचेरी येथील श्री बालाजी विद्यापीठातील योग थेरपीचे प्राध्यापक डॉ. आनंदा बालयोगी भवनानी, द लोणावळा योग इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. मंमथ घरोटे, महाराष्ट्रीय मंडळाचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, सरचिटणीस रोहन दामले, संस्थेच्या शिक्षण विभागाच्या संचालिका नेहा दामले, परिषदेचे अध्यक्ष डॉ सोपान कांगणे, निमंत्रक प्रो उज्वला राजे, डॉ पल्लवी कव्हाणे, रणजीत चितळे आणि आदित्य बेहेरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

गुलटेकडी येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या परिसरातील सकल ललित कलाघर येथे ही दोन दिवसीय परिषद संपन्न होत आहे. ‘मॅट टू माईंड’ ही परिषदेची मध्यवर्ती संकल्पना असून यासाठी योग व आयुर्वेदा प्रबोधिनी आणि फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया यांचे विशेष सहकार्य लाभले आहे

परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. एच आर नागेंद्र म्हणाले, “केंद्रीय क्रीडा विभागाने स्पर्धात्मक खेळांमध्ये आता योगासनांचा सहभाग केल्याने आज तरुण, युवक आणि विद्यार्थी दशेतील मुले मुली मोठ्या प्रमाणात योगासनांकडे वळत आहेत. ही महत्त्वपूर्ण बाब असून लवकरच ऑलिम्पिक क्रीडा प्रकारात योगासनांचा सहभाग होण्याचे स्वामी रामदेव यांचे स्वप्न साकार होईल असा मला विश्वास आहे. शारीरिक क्षमतेसोबतच मानसिक संतुलन आणि सर्वांगीण विकास हे योगचे उद्देश जागतिक पातळीवर जावे, हीच आमची इच्छा आहे. भारताने जगाला योग आणि योगासनांचा महत्त्वपूर्ण आयाम दिला आहे, याचा आपल्याला अभिमान असायला हवा. २१ जून हा दिवस जगभरात योग दिन साजरा होताना पाहणे ही अभिमानास्पद आणि आनंददायी बाब आहे.”

समाज म्हणून आपला विकास होत असताना महाराष्ट्रीय मंडळाने शारीरिक शिक्षणाची गरज १०० वर्षांपूर्वीच लक्षात घेतली ही कौतुकास्पद बाब आहे. आता सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठ स्तरावर त्याचा आणखी प्रचार प्रसार व्हायला हवा, असेही डॉ. नागेंद्र यांनी नमूद केले.

“योगासने आपल्याला शारीरिक प्रयत्नांपासून सुखासनाचा पर्यंतचा प्रवास घडवितात. शारीरिक प्रयत्नांपासून ते मनाच्या शांतीचा प्रवास आपण या दरम्यान अनुभवितो म्हणून या आंतरराष्ट्रीय परिषदेची संकल्पना मला खऱ्या अर्थाने पूरक वाटते. योगद्वारे आपण चित्त वृत्ती विनियोग: याची अनुभूती घेतो असे सांगत डॉ. नागेंद्र पुढे म्हणाले की, “आपल्या प्राचीन शिक्षणपद्धतीत योग समाविष्ट असल्याने सर्जनशील मन, बुद्धिमत्ता, ज्ञान या गोष्टी शिक्षणाद्वारेच येत होत्या, मात्र मेकॉलेने आपल्या शिक्षणपद्धतीत बदल केल्याने भारतीय या प्राचीन ज्ञानापासून दूरावले. आज पुन्हा आपल्याला आपल्या शिक्षणपद्धतीत योग या विषयाचा समावेश करीत जगाला योगाभ्यासाचे महत्त्व पटवून द्यायचे आहे.” सध्याची जीवनपद्धती पाहता शारीरिक मानसिक असंतुलन वाढले आहे, त्यामध्ये योग महत्त्वाचा वाटा निभावेल, असा विश्वास यावेळी डॉ. नागेंद्र यांनी व्यक्त केला.

आज भारत गगनयानाद्वारे मानवाला अंतरिक्षात पाठवायची तयारी करीत असताना अंतराळवीरांच्या प्रशिक्षणात योगाभ्यासाचा असलेला समावेश योगचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे, असे निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी सांगितले.

ऋषींनी प्राचीन काळी मांडलेली योगसंस्कृती आज आधुनिक उदाहरणांद्वारे आपल्याला समजून घ्यावी लागेल असे सांगत डॉ. आनंदा बालयोगी भवनानी म्हणाले, आधुनिक काळात पारंपारिक संकल्पना समजून घेत, भावी पिढीला योग शिकवीत समृद्ध जीवनशैलीकडे नेणे हे आपले कर्तव्य आहे. योगोपचार पद्धती ही अतिशय सोपी असून ध्यान हे त्याचे मर्म आहे.”

डॉ. मंमथ घरोटे म्हणाले, “आज आपण योगच्या केवळ भौतिक पैलूंकडेच पाहतो ही दुर्दैवी बाब आहे. आज योगाभ्यासाचे मूळ समजून घेणे महत्त्वाचे आहे. भौतिक समृद्धी असून आपण अनेक विकारांचा सामना करीत आहोत. यांवर मात करायची असेल तर योग हा एकमेव मार्ग आहे. बहुतेक प्राचीन हस्तलिखिते योग मनासाठी असल्याचे सांगण्यात आले आहे, यावर विचार व्हावा.”

सदर आंतरराष्ट्रीय परिषदेत अष्टांगयोग, योगाभ्यास, योगासने आदी विषयांशी संबंधित विविध विषयांवर उहापोहा होईल. या सोबतच योग या विषयात देशात झालेले कार्य, सध्याची परिस्थिती आणि भविष्यात करता येण्यासारख्या बाबींवर चर्चेसाठी एक सर्वसमावेश व्यासपीठाद्वारे विचारांचे आदानप्रदान होईल. परिषदेचा समारोप उद्या (दि. १७ फेब्रुवारी) रोजी मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेचे संस्थापक आणि माजी संचालक डॉ. ईश्वर बसवरेड्डी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

या सर्व मान्यवरांसोबत कैवल्यधामचे डॉ रणजीत भोगल, द लोणावळा योगा इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. मंमथ घरोटे, अय्यंगार इन्स्टिट्यूटच्या योगाचार्य अभिजाता अय्यंगार, व्हिएतनाम व थायलंड येथील क्रीयोगाचे मास्तर कमल, पुण्यातील परम योगाच्या संस्थापिका डॉ रेणू महतानी, नॉर्वेच्या विकिंग फूटबॉल क्लबचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी ऐरिक हेनिंगसेन, नाशिकच्या योगा विद्याधामचे डॉ गंधार मंडलिक, पुण्यातील कोहम योग शाळेच्या सुचेता कडेठणकर, विश्वानंद केंद्राचे योगाचार्य डॉ. मंडलेचा. शाश्वत योग व आयुर्वेदा संस्थेचे डॉ. विश्वजीत चव्हाण, वेद योग शिक्षण आणि संशोधन फाउंडेशनचे डॉ. रुपेश थोपटे आणि महाराष्ट्रीय मंडळाच्या योग आणि आयुर्वेदा प्रबोधिनीच्या डॉ पल्लवी कव्हाणे आदी तज्ज्ञांचा सहभाग हे महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे.

व्याख्याने, कार्यशाळा, माहितीपूर्ण प्रदर्शनी आणि महत्त्वाच्या विषयांवरील पेपर्सचे सादरीकरण, प्रात्याक्षिके यांसोबतच संकल्पनांशी संबंधित अनेकविध विषयांची माहिती या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत उपस्थितांना मिळणार आहे. सध्या जागतिक पातळीवर योग या विषयावर सुरु असलेली चर्चा, घडामोडी यांसोबतच कार्यक्रम आणि प्रात्यक्षिके यांची माहिती देणारे प्रदर्शन हे या परिषदेचे एक विशेष आकर्षण आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading