Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

‌‘समुद्र वेल’मधून वास्तव दुनियेचे दर्शन : प्रा. डॉ. संदीप सांगळे


पुणे : समृद्ध अनुभवविश्वाचा उत्स्फूर्त आविष्कार करण्याचे व्यासपीठ म्हणजे लेखन. रुक्ष वातावरणात राहूनही विठ्ठल चव्हाण यांनी आपल्या काव्यसंग्रहातून समाजजीवनातील खोली शोधण्याचा प्रयत्न केला असून वास्तव दुनियेचे दर्शन घडविले आहे, असे गौरोवोद्गार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे यांनी काढले.
आडकर फौंडेशनतर्फे निवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठल चव्हाण लिखित ‌‘समुद्र वेल’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन रविवारी प्रा. डॉ. सांगळे, प्रसिद्ध कवी-गीतकार राजन लाखे, प्रसिद्ध कवी-गझलकार भूषण कटककर, आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर आणि प्रसिद्ध निवेदिका शिल्पा देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यावेळी डॉ. सांगळे बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सहभागृहात कार्यक्रम झाला. धनलक्ष्मी पब्लिकेशनने हा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे.
डॉ. सांगळे पुढे म्हणाले, कविता सुचणे, ती शब्दबद्ध करणे आणि वाचकांसमोर येणे हा लेखकाचा चिंतन, मनन आणि लेखन असा प्रवास असतो. ‌‘समुद्र वेल’ हा काव्यसंग्रह अनुभव विश्वाच्या समृद्धीचे प्रतिक आहे. साहित्य आणि समाज या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून समाजजीवनाचे प्रतिबिंब या आरशाद्वारे दाखविले आहे.
राजन लाखे म्हणाले, चव्हाण यांनी आपल्या काव्यातून विचारांचा आविष्कार दर्शविला आहे. मनात येणाऱ्या विचारांना अन्‌‍ शब्दांना कल्पनेची जोड देऊन वास्तवतेची मांडणी केली आहे. प्रज्ञा, प्रतिभा आणि कल्पकता याची मांडणी या काव्यसंग्रहातून झाली आहे.
भूषण कटककर म्हणाले, समाजव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच कवितांच्या माध्यतून संस्कृती रक्षणाचे काम चव्हाण यांनी आपल्या लिखाणातून केले आहे. समाजातील क्रौर्य, व्यथा संवेदनशील मनाने शब्दबद्ध केल्या आहेत. आकृतीबंधाचा अट्टाहास न करता मनात जे आले ते शब्दबद्ध केले आहे. अनुभूतीतून जन्मलेली कविता श्रेष्ठ आकृतीबंध ठरते.
भावभावनांचे कोंदण मिळाले की काव्यनिर्मिती होते, असे सांगून ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, ‌‘समुद्र वेल’ या काव्यसंग्रहातून अनेक विषयांना वाचा फोडली आहे. हृदयापासून आले ते कागदावर उतरविले आहे. चव्हाण यांनी आयुष्यातील जीवनानुभवच कवितेच्या माध्यमातून मांडले आहेत.
लेखनामागील भूमिका मांडताना विठ्ठल चव्हाण म्हणाले, कविता वाईट की चांगली याचा विचार न करता कवितेच्या माध्यमातून मनातील भाव वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. आयुष्यात आलेल्या प्रसंगांवर लिखाण केले असल्याचे सांगून त्यांनी ‌‘गाव मोठं कमालीचं’ ही कविता सादर केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading