राम जन्मभूमी आत्मप्रतितीचे स्थानक : प्रणव गोखले
पुणे : अयोध्या हीच राम जन्मभूमी असल्याचे सनातन वैदिक परंपरेच्या शाखांकडून मिळालेल्या माहितीद्वारे तसेच संत परंपरेतील अभंगांद्वारे स्पष्ट झाले आहे. अयोध्या ही केवळ स्थूल भूमी किंवा देश म्हणून मर्यादित न राहता आत्मप्रतितीचे स्थानक आहे, असे प्रतिपादन भारतीय संस्कृती तत्त्वज्ञानाचे अभ्यासक प्रणव गोखले यांनी यांनी केले.
सहकारनगरमधील सहजीवन व्याख्यानमालेतील या वर्षीचे अखेरचे पुष्प गोखले यांनी ‘भारतीय संस्कृतीतील रामजन्मभूमी’ या विषयावर गुंफले. मुक्तांगण बालरंजन केंद्र येथे आयोजित व्याख्यानमालेचे यंदाचे 23वे वर्ष होते. व्याख्यानमालेचे अध्यक्ष विनय कुलकर्णी, विजय ममदापूरकर, नितीन पाटील, राजू मेहता, अनंत वेरेकर मंचावर होते.
प्रणव गोखले पुढे म्हणाले, राम जन्मभूमीविषयी जनाधार काय आहे याकडे लक्ष न देता अयोध्या ही राम जन्मभूमी आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरावे मागितले गेले. ज्या स्थानाला महत्त्व प्राप्त होते त्याच्या प्रतिकृती इतरत्र उभारल्या जातात आणि त्या प्रतिकृती मूळ असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला जातो.
भारतीय संस्कृती जी या जन्मस्थानाविषयी, जन्मभूमीविषयी वेगवेगळ्या धारणांनी विकसित होत गेली, एक प्रकाराचा वाद-संवाद आणि त्या संवादातून झडलेले विवाद आणि पुन्हा संवाद निर्माण झाले. ज्यांनी वाद मांडले पण ज्यांनी सनातन ग्रंथांचे, परंपरांचे, धारणेचे प्रामाण्य स्वीकारले त्यांना अयोध्या हीच राम जन्मभूमी आहे हे मानणे क्रमप्राप्त झाले. त्यामुळे विवादाचे रूपांतर संवादात झाले. त्यामुळे राम जन्मभूमीचा सुदीन आपल्याला बघता येत आहे. ते पुढे म्हणाले, एक विशाल जनशक्ती या धारणेच्या बाजूने उभी राहिली आहे. एका धारणेला, एका विचाराला धरून पूर्ण समाजाला एकत्र आणण्याचे काम ज्या घटनेमुळे घडले, ज्या वास्तूमुळे घडले ती वास्तू राम जन्मभूमीच आहे. भारतीय संस्कृतीतील राम जन्मभूमी हे प्रकरण केवळ एका धार्मिक संघर्षापुरते मर्यादित न राहता त्याच्या पलिकडे जाऊन ज्या कालातीत भारतीय संस्कृतीतील वाद-संवाद या व्यवस्थेतून साकार झाले. हीच परंपरा, हीच संस्कृती पुढे नेण्यासाठी एक दिग्दर्शक म्हणून हे प्रकरण सिद्ध झाले आहे. भारताची आगामी काळातील विचारपद्धती कशी असावी हे संघर्षातून दिसून आले आहे.
