प्रत्येक प्रश्नाचे उत्तर महामाता रमामाई : किरण केंद्रे
पुणे : शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सांगितले त्या बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी रमामाईंनी अतोनात कष्ट सोसले. आयुष्यात येणाऱ्या समस्यांचे, प्रश्नांचे उत्तर महामाता रमाई आहेत, असे प्रतिपादन बालभारतीचे संपादक किरण केंद्रे यांनी केले.
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समितीतर्फे महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या महामाता रमाई महोत्सवात किरण केंद्रे आणि वनिता वागसकर यांना आज (दि. 7) रमाईरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराला उत्तर देताना केंद्रे बोलत होते. पुरस्काराचे वितरण महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, कार्याध्यक्ष सचिन ईटकर यांच्या हस्ते करण्यात आले. महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवाचा पुरस्कार वितरण सोहळ्याने समारोप झाला. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक विठ्ठल गायकवाड, लता राजगुरू, माजी मंत्री रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड, योगेश बागवे, बाबू वागसकर, प्रा. यशवंत गोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरुवातीस महोत्सवाचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर यांनी पुरस्कार वितरण सोहळ्यामागील भूमिका विशद केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महामाता रमामाई यांच्यातील शिक्षणासंदर्भातील भावस्पर्शी पत्रव्यहार कसा होता याची काही उदाहरणे त्यांनी दिली. पुरस्कारार्थिंचा परिचय महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी करून दिला.
महामाता रमामाईने दिलेला विचारांचा वारसा पुढे न्यायचा आहे, असे सांगून केंद्रे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महामाता रमामाई यांच्याकडून मिळालेला वैचारिक वारसा कधीही नष्ट होणारा असा नाही.
सामाजिक कार्यासाठी मिळालेला पुरस्कार स्फूर्ती देणारा आहे, असे प्रतिपादन वनिता वागसकर यांनी केले.
रमेश बागवे म्हणाले, या महोत्सवामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महामाता रमाई यांचे विचार घराघरात पोहोचले आहेत.
स्मारकाची वास्तू चैतन्यमय असल्याचे सांगून ॲड. अभय छाजेड म्हणाले, महोत्सवामुळे समाजाला पुरोगामी विचार देण्याचे मोलाचे कार्य सुरू आहे. अविनाश बागवे यांनी मनोगत व्यक्त केले.
मान्यवरांचे स्वागत लता राजगुरू यांनी केले तर आभार मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड यांनी मानले.
