वनविभागाची परीक्षा देऊन परतत असणाऱ्या तीन बहीण-भावंडांचा अपघाती मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : वनविभागाची परीक्षा देऊन परतत असताना तीन बहीण-भावंडांचा अपघाती मृत्यू झाला असल्याची हृदयद्रावक घटना आज (दि.8) छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली. आज सकाळी पावने दहाच्या सुमारास बीड वळण रस्त्यावरील बाळापूर फाट्याजवळ हा अपघात घडला. प्रवीण अंभोरे, प्रतिभा अंभोरे व लखन अंभोरे अशी मृतांची नावे असून तिघेही मूळचे जिंतूर तालुक्यातील राहणारे आहेत.
चिकलठाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रविकांत दरवडे यांनी दिलेल्या माहिती नुसार, आज सकाळी हे तिघेही बहीण-भावंड वनविभागाच्या परिक्षेशी संबंधित मैदानी चाचणी देण्यासाठी दुचाकीवरून गेले होते. परीक्षा झाल्या नंतर झाल्टा फाट्याकडून तिघेही भावंडे बाळापूर परिसरातून सातारा-देवळाई भागात असलेल्या रूमकडे जाण्यासाठी निघाले होते. याच वेळी बाळापूर फाट्याजवळ एक हायवा ट्रक खडीकच टाकून धूळ उडवत ओव्हरटेक करत सुसाट निघाला होता. मात्र पुढे जाताना अंभोरे भावंडांच्या दुचाकीला त्याने धडक दिली. दुचाकीवरील भावंडे एका बाजूने निघालेले असतानाही मागून येऊन हायवा धडकल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी वनविभागाच्या परिक्षेचे प्रवेशपत्र आदी साहित्य विखरून पडलेले होते. त्यावरून पोलिसांना मृत भावंड्यांच्या राहण्याचा पत्ता मिळवला. मृतांच्या एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार अंभोरे भावंडे हे जिंतूरचे असून येथे सातारा परिसरातील शिवछत्रपतीनगरमधील एका हॉटेलच्या मागील बाजूस राहायला होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.
दरम्यान, तिन्ही भावंडांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पुढील तपास चिकलठाणा पोलिस करीत आहेत.
