Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शासन आणि प्रशासन ही लोकशाहीच्या रथाची दोन चाके – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई  : शासन आणि प्रशासन ही लोकशाही रथाची दोन चाके आहेत. ही दोन्ही चाके समान वेगाने धावलीत की विकास वेगाने होतो. याचे उदाहरण राज्यात पहायला मिळत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ३८ व्या वर्धापन दिनानिमित्त वांद्रे येथे आयोजित कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर कोकण विभागाचे आयुक्त महेंद्र कल्याणकर, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, राजेंद्र भोसले, महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, कोशाध्यक्ष नितीन काळे, कल्याण केंद्र समन्वयक श्री.टाव्हरे, सरचिटणीस समीर भाटकर आदी उपस्थित होते. राज्याच्या कारभारात अधिकाऱ्यांचे मोठे योगदान असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की, राज्याच्या कारभारात तुमचे काम महत्वाचे आहे. नियमांचे पालन करून अधिकारी काम करत असतात. काम नियमांमध्ये कसे करावे याचे चांगले ज्ञान अधिकारी वर्गाकडे आहे. अधिकारी हे शासनाचे अविभाज्य अंग आहे. राज्याचा गाडा हाकताना रथाची चाके आपण आहोतच. पण त्याचबरोबर या चाकांमध्ये वंगण घालण्याचे काम ही अधिकारी वर्ग करत असतो. शासन आणि प्रशासन यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे राज्यात सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचेही मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शासन राज्यातील शेतकरी, कामगार, कष्टकरी, महिला, ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी अनेक योजना राबवत आहे. अनेक लोककल्याणकारी निर्णय घेत आहे. या योजना आणि निर्णय लोकांपर्यंत पोहचवण्याचे आणि त्याचा लाभ लोकांना देण्याचे काम प्रशासन करत आहे. सरकारची प्रतिमा निर्माण करण्याचे काम अधिकारी करत आहेत. लोकांच्या जीवनात चांगले दिवस येतील ही शासनाची भूमिका आहे. त्यासाठी योजनांची अंमलबजावणी अधिकारी करत असतात. राज्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची उभारणी होत आहे. त्यामुळेच आज राज्यात परदेशी गुंतवणूकदार आकर्षित होत आहेत. गेल्या वर्षी दावोस येथे करण्यात आलेल्या सामंजस्य करारांपैकी ८० टक्के करार पूर्ण झाले आहेत. यंदा ३५३ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. उद्योगांसाठी पोषक वातावरण असलेले राज्य अशी महाराष्ट्राची ओळख आहे. देशात परकीय गुंतवणुकीत राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. जीडीपी मध्येही राज्याचा मोठा वाटा आहे. हे सर्व आपण अधिकाऱ्यांच्या जोरावर करत आहोत. लोकांच्या भल्यासाठी काम करणारे अधिकारी लोकप्रिय असतात, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख काम करावे असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त लोकांना भेटावे. जितके जास्त अधिकारी जनतेला भेटतील तितके चांगले काम होईल आणि माझ्याकडे येणाऱ्या लोकांचे प्रमाण कमी होईल.

महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी भरीव निधी देणार राजपत्रित अधिकारी महासंघाच्या अनेक मागण्या आहेत. या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्या पूर्ण होतील. महासंघ कल्याण केंद्रासाठी निधी दिला जाईल. जुन्या निवृत्ती वेतन योजनेबाबत येत्या अधिवेशनात सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. प्रास्ताविकात महासंघाचे अध्यक्ष देसाई यांनी महासंघाच्या कामाचा आढावा घेतला. तसेच आतापर्यंत केलेल्या मागण्या मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री  शिंदे यांचे आभार व्यक्त केले. आभार  काळे यांनी व्यक्त केले तर सूत्र संचालन मीनल जोगळेकर यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading