प्रदर्शनीच्या माध्यमातून उलगडणार जपानी सुशी या खाद्यपदार्थाचा आजवरचा प्रवास
येत्या ८ ते २० जानेवारी दरम्यान कोथरूड येथील एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या आवारात चाणक्य इमारतीत ही प्रदर्शनी संपन्न होणार असून त्यासाठी संस्थेच्या मागील गेटने स्वप्नपूर्ती सभागृहाच्या जवळून प्रवेश करता येईल. सकाळी १० ते सायं ५ दरम्यान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात असून ती सर्वांसाठी विनामूल्य खुली आहे.
प्रदर्शनीविषयी अधिक माहिती देताना सिद्धार्थ देशमुख म्हणाले, “सुशी हा खाद्यपदार्थ पारंपारिक जपानी संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. कोणत्याही पदार्थाप्रमाणे सुशी या पदार्थाचा प्रवास हा प्राचीन काळापासून आजच्या आधुनिक काळापर्यंत झालेला आपल्याला पहायला मिळतो. हे होत असताना या पदार्थाच्या चवीमध्ये तसेच ती बनविण्याच्या पद्धतीमध्ये देखील बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. सुशीचा हाच प्रवास चित्रे, व्हिडीओ आणि पोस्टर्सच्या माध्यमातून पुणेकरांपर्यंत पोहोचावा हा ही प्रदर्शनी आयोजित करण्यामागील मुख्य उद्देश आहे.”
कॉन्सुलेट जनरल ऑफ जपान इन मुंबई यांच्या विशेष प्रयत्नांमधून पुण्यासारख्या कॉन्सुलेट नसलेल्या शहरात या प्रदर्शनीचे आयोजन होत आहे, ही आमच्यासाठी महत्त्वाची बाब आहे याकडे देशमुख यांनी लक्ष वेधले.
सुशी शौकीनांमध्ये एडो साम्राज्याचा काळ (इ. स. १६०३ – १८६८) हा सुवर्णकाळ मानला जातो. एडो-शैलीतील सुशी संस्कृतीच्या समृद्ध खुणा, सुप्रसिद्ध निगिरी-झुशीचा जन्म, कालांतराने या पदार्थाच्या चवीमध्ये झालेले बदल, बदललेल्या पद्धती कलात्मकदृष्ट्या या प्रदर्शनीत मांडल्या असून समकालीन सुशीचे बदललेले रूप देखील व्हिडीओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहता येणार आहे. सुशी बनविण्याचे पारंपारिक तंत्र ते आज जपानमध्ये अत्याधुनिक यंत्राच्या मदतीने तयार होणारी सुशी याची माहिती देखील या प्रदर्शनीमध्ये इच्छुकांना घेता येणार आहे.
सदर प्रदर्शनीचे उद्घाटन सोमवार दि. ८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता संपन्न होणार असून या प्रसंगी एमआयटी समूहाचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि कार्यकारी अध्यक्ष डॉ राहुल कराड, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कुलगुरू रवी कुमार चिटणीस, कॉन्सुलेट ऑफ जपान इन मुंबईच्या कल्चर काउंसिल मेगुमी हमुरो, जपान फाउंडेशनचे भाषा सल्लागार तोमोनारी कुरोडा आणि आयजेबीसीचे संस्थापक अध्यक्ष असलेले सिद्धार्थ देशमुख आदी मान्यवर उपस्थित असतील.
