वंचित बहुजन आघाडीची शौर्य दिनानिमित्त भव्य दुचाकी रॅली, सुजात आंबेडकर यांनी केले नेतृत्व
पुणे – वंचित बहुजन युवा आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी यांच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त पूर्वसंध्येला “भव्य अभिवादन बाईक रॅली” रविवारी रात्री आयोजित करण्यात आली होती. या भव्य दुचाकी रॅलीचे
नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले. रॅलीच्या सुरुवातीला प्रथम महात्मा फुले वाडा, समताभूमी गंज पेठ या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज तसेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकास देखील अभिवादन करण्यात आले. पुणे स्टेशन येथील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. या दुचाकी रॅलीमध्ये भीमा कोरेगाव विजय स्तंभाच्या प्रतिकृतीची आकर्षक सजावट केलेला रथ देखील सहभागी होता. या भव्य दुचाकी रॅलीमध्ये 5 हजार दुचाकी स्वार तसेच शंभर चार चाकी कारसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पुणे स्टेशन जहांगीर हॉस्पिटल मार्गे बंडगार्डन रस्त्याने येरवडा रामवाडी नगर रोड मार्गे हि दुचाकी रॅली भीमा कोरेगाव विजयस्तंभापर्यंत शिस्तबद्ध पद्धतीने नेण्यात आली. यावेळी रॅलीच्या मार्गावर विविध मंडळांनी आतिषबाजी करून रॅली चे स्वागत केले. तसेच अनेक ठिकाणी सुजात आंबेडकर यांचे देखील उत्साहात स्वागत करण्यात आले. भीमा कोरेगाव विजय स्तंभावर सुजात आंबेडकर यांनी ठीक मध्यरात्री बारा वाजता अभिवादन करून मानवंदना दिली. तसेच विजय स्तंभावर उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन देखील केले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, राज्य कार्यकारणी सदस्य पुणे जिल्हा निरीक्षक ऋषिकेश नांगरे -पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य अमित भुईगळ , अमोल लांडगे , ऍड.अफरोज मुल्ला ,विशाल गवळी, कोल्हापूर जिल्हा निरीक्षक महाराष्ट्र देखरेख समिती सदस्य अतुल बहुले, जिल्हाध्यक्ष कमलेश उकरांडे, जिल्हाध्यक्ष राजकुमार ,महिला जिल्हाध्यक्ष सीमा भालेसैन, पुणे शहर महिला शहर अध्यक्ष अनिता चव्हाण ,
माथाडी अध्यक्ष विशाल कसबे
,पुणे शहर अध्यक्ष सोमनाथ पानगावे , पिंपरी- चिंचवड शहर अध्यक्ष नितीन गवळी, महासचिव सुनील जावळे, महासचिव शुभम चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट कामगार जनरल युनियन, वंचित बहुजन महिला आघाडी,
फुले आंबेडकर विद्वत सभा, भारतीय बौद्ध महासभा,समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या भव्य दुचाकी रॅलीचे संयोजक वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहर व पिंपरी- चिंचवड शहर कार्यकारणी यांच्या वतीने करण्यात आले होते.
