Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

कलाकारांना गुरुशिवाय पर्याय नाही : पांडुरंग मुखडे


पुणे : उत्तम संस्कारासाठी गुरू चांगला असावा लागतो. नाट्यसंस्कार कला अकादमीद्वारे मुलांवर लहानपणापासूनच उत्तम संस्कार केले जात आहेत. संगीत, नाटक, नृत्य, खेळ आदी क्षेत्रात गुरुशिवाय पर्याय नाही. गुरुंमुळे शिष्य किती मोठा होतो हे नाट्यसंस्कार कला अकादमीच्या गुरूंनी अनुभवले आहे, असे प्रतिपादन भरत नाट्य मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे यांनी केले.
नाट्यसंस्कार कला अकादमीच्या 45व्या वर्धापन दिनानिमित्त आज  गजरा नाट्यछटांचा’ या दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या नाट्यछटांचे, ‌‘कठपुतली’ या नवीन बाल एकांकिकेचे त्याच प्रमाणे रविवार सत्र नाट्य कार्यशाळेच्या समारोप समारंभानिमित्त विद्यार्थ्यांचे सादरीकरण झाले. याच कार्यक्रमात रुग्णसेवा करणाऱ्या मीनाताई कुर्लेकर यांना कै. रमाकांत कुलकर्णी रुग्णमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर नाट्यसंस्कार पालक गौरव पुरस्कार युवा उद्योजिका रुद्धी केंढे हिचे पालक रुपाली व सुरेश केंढे तसेच अभिनेता ओंकार गोखले याचे पालक मंजिरी व मोहन गोखले यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कारांचे वितरण मुखडे यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते. नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी, विश्वस्त दिपाली निरगुडकर, संध्या कुलकर्णी, रुग्णमित्र हरिओम काका मंचावर होते.
नाट्यसंस्कार कला अकादमीमधील विद्यार्थ्यांना केवळ नाटकच शिकविले जाते असे नाही तर मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न केले जातात, असे सांगून रुपाली केंढे म्हणाल्या, नाट्य प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना आयुष्यातील वाटचालीत आत्मविश्वास मिळतो.
पालक पुरस्कार स्वीकारल्यानंतर मोहन गोखले म्हणाले, नाट्यसंस्कार नाट्य शिबिरांमधून विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होण्यास मदत होते. नाट्यसंस्कारमध्ये प्रशिक्षण घेतलेली मुले भविष्यकाळात कुठल्याही क्षेत्रात गेल्यास ती यश प्राप्त करू शकतात.
प्रास्ताविकात प्रकाश पारखी म्हणाले, नाट्यसंस्कार कला अकादमीमध्ये विद्यार्थ्यांवर फक्त अभिनयाचेच नव्हे तर विविधांगी संस्कार केले जातात तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पालकांनाही मार्गदर्शन केले जाते.
रुग्णमित्र पुरस्कारप्राप्त मीनाताई कुर्लेकर म्हणाल्या, अन्न, वस्त्र निवाऱ्याबरोबरच प्रेमाची देवाण-घेवाण होणे ही देखील मानवाची मुलभूत गरज आहे. आपल्या पाठीवर कोणी कौतुकाची थाप दिल्यास अजून जोमाने कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते. प्रत्येक व्यक्तीचे शरीर त्याच्याशी काही बोलत असते, संवाद साधत असते ते ऐकायला शिकणे आवश्यक आहे.
दहावी-बारावीत यश संपादन करणाऱ्या नाट्यसंस्कार कला अकादमीच्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पुरस्कारार्थिंचा परिचय श्रीराम ओक, अनुराधा कुलकर्णी यांनी करून दिला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता सोहोनी यांनी तर आभार संध्या कुलकर्णी यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading