Saturday, April 4, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

वैज्ञानिक विवेकवाद सामाजिक न्यायासाठी वापरला पाहिजे – डॉ. अतीश दाभोलकर

पुणे : “मानवाने निरीक्षण, तर्क, प्रयोग यातून निसर्गनियम समजावून घेऊन विश्वाच्या संरचनेबाबतचे सखोल ज्ञान आपल्या प्रयोगशाळेत बसून समीकरणांच्या आधारे मिळवून त्या आधारे मानवी समाजाची दैदीप्यमान प्रगती साधली ही थक्क करणारी गोष्ट आहे. ही दैदीप्यमान प्रगती साधण्यासाठी सहाय्य करणारे विज्ञान मानवी संस्कृतीचा अमूल्य वारसा आहे व तो वारसा समाजाच्या तळागाळापर्यन्त पोहोचवला पाहिजे. तसेच वैज्ञानिक विवेकवाद सामाजिक न्यायासाठी वापरला गेला पाहिजे” असे प्रतिपादन शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार प्राप्त भौतिकशास्त्रज्ञ डॉ. अतीश दाभोलकर (इटली) यांनी केले. ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वार्षिक विशेषांकाच्या प्रकाशन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

डॉ. अतीश दाभोलकर पुढे म्हणाले, “वैज्ञानिक विवेकवाद सामाजिक न्यायासाठी वापरला गेला पाहिजे तसेच देशात लोकशाही रूजवायची असेल तर संसदेसारख्या व्यवस्था उभ्या करत असताना वैज्ञानिक चित्तवृत्ती (दृष्टिकोन) प्रत्येक नागरिकांनी आत्मसात केली पाहिजे अशी भूमिका असणाऱ्या नेहरू आणि डॉ. आंबेडकरांनी विज्ञानाला अग्रक्रम देत वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, प्रश्न विचारणारी शोधक वृत्ती यातून सुधार घडवून आणणारी कृती याचा आपण विकास आणि संवर्धन केले पाहिजे हे महत्वाचे कलम भारतीय संविधानात समाविष्ट केले”.

डॉ. अतीश दाभोलकर पुढे म्हणाले की,”आज विज्ञानाच्या आधारे साधलेल्या दैदीप्यमान प्रगती बद्दल कोणताही सामान्य माणूस शंका घेऊ शकत नाही. असे असले तरी एका बाजूने आपण विज्ञानाची चांगली फळे चाखत आहोत तर दुसऱ्या बाजूने विज्ञानाच्या पद्धतीबद्दलच शंका निर्माण करणारे अती डावे व अती उजवे विचारप्रवाह अलिकडील काळात निर्माण झालेले आपण पाहत आहोत.” या विचारप्रवाहांचा ऊहापोह करताना त्यांनी वर्ण, धर्म, जात, भाषा, रुढी, परंपरा, देशभक्ति याबद्दलचा खोटा अभिनिवेश, पारलौकिकता, वसाहतवादी वृत्ती, अभिजनाची मक्तेदारी यांना खतपाणी घालणाऱ्या विचारप्रवाहाचा परामर्श घेतला व या विचारप्रवाहानी निर्माण केलेल्या आजच्या आव्हानांवर विज्ञानाच्या सहाय्याने ज्ञानसंपन्न होणे, त्या आधारे आपण वैश्विक सत्ये प्रस्थापित करू शकतो हा विश्वास बाळगणे, धर्म आणि राजकारणाची फारकत करणे, पोथीनिष्ठा नाकारणे, व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित ठेवणे आणि लोकशाही व्यवस्था उभारणे या आधारे मात करू शकतो असा आशावाद डॉ . अतीश दाभोलकर यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजीव देशपांडे, पाहुण्यांची ओळख मुक्ता दाभोलकर, आभार राहुल थोरात, सूत्रसंचालन रुपाली आर्डे, गीत गायन अण्णा कडलास्कर यांनी केले. कार्यक्रमास राज्यभरातून अंनिसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading