आत्मबोध होणे गरजेचे प्रसिद्ध पत्रकार सौरभ द्विवेदी यांचे मत
पुणे : स्वराज्य म्हणजे केवळ पाच वर्षांतून एकदा येणाऱ्या निवडणुकीत मतदान करा आणि आपली जबाबदारी पूर्ण, असे मुळीच नाही. तुम्हाला पाच वर्षातील घडामोडींचा आत्मबोध घेऊन, विचार करण्याची आवश्यकता आहे, असे मत प्रसिद्ध पत्रकार सौरभ द्विवेदी यांनी सोमवारी व्यक्त केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित मुलाखतीत द्विवेदी बोलत होते. यावेळी पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी द्विवेदी यांचा सत्कार केला. प्रा. योगेश बोराटे यांनी द्विवेदी यांना प्रश्न विचारत बोलते केले.
द्विवेदी म्हणाले की, पत्रकाराने प्रश्न विचारलेच पाहिजे. सत्ताधारी असो की विरोधी पक्षातील नेते असो, पत्रकाराने जनतेच्या वतीने प्रश्न विचारायचे काम केलेच पाहिजे. असे प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना नागरिकांनी आपला पाठिंबा आणि सहकार्य दिले पाहिजे. माझे शिक्षण कानपूरमधील दीनदयाळ उपाध्याय शाळेत झाले, तर लोकांनी संघी असल्याचे सांगितले. त्यानंतर उच्च शिक्षण हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून झाल्याचे समजल्यावर, माझ्यावर कम्युनिझमचा शिक्का लावायला सुरुवात केली. असे अनेक प्रेक्षक लिहितात. या प्रेक्षकांचे योग्य प्रबोधन झाले नसल्याने, ते लिहितात. मात्र, या प्रवसात मला दोन्ही विचारधारा समजता आल्या. टीका करणाऱ्यांपेक्षा प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांची संख्या अधिक आहे, असे द्विवेदी यांनी सांगितले.
द्विवेदी म्हणाले की, डिजिटल माध्यमातून काम करताना स्पष्ट, सरल आणि सरस हे तीन शब्द महत्त्वाचे आहे. तुम्हाला जे मांडायचे आहे, त्याबाबत स्पष्टता हवी. आपल्याकडील ज्ञान के अगदी सोप्या शब्दात लोकांना आपल्या प्रेक्षकांना समजावता आले पाहिजे. योग्य, उच्च आणि खरी माहिती ही लोकांपर्यत पोहोचवण्याची ताकद पाहिजे. आमच्याकडे कोणी उच्च आणि कोणी निम्न नाही, तर सर्वांना समान वागणूक आहे. जुन्या आणि नव्याचा संगम आहे. त्यामुळे सामान्य जनतेशी आमची नाळ जुळली राहते, असे द्विवेदी यांनी सांगितली. महाराष्ट्र राज्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. त्यामुळे येथील संस्कृती आणि मराठी भाषा ही अन्य राज्यातील लोकांनीही शिकली पाहिजे. याचाच एक भाग म्हणून मी मराठी शिकत आहे. पुढच्या वेळी पुण्यात कार्यक्रमाला आल्यानंतर, मराठीत संवाद साधणार असल्याचा विश्वास द्विवेदी यांनी दिला. यावेळी द्विवेदी यांनी आपल्या शिक्षणापासून ते लल्लनटॉप सुरू करण्याचा प्रवास सांगितला.
….
पुणे शहर मनापासून आवडते. या शहराची ऐतिहासिक परंपरा, संस्कृती, संताची परंपरा, शैक्षणिक महत्त्व अद्भुत आहे. अनेक मित्र या शहरातील आहेत. महाभारतात संशोधन केलेली भांडारकर संस्था, फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, फर्ग्युसन कॉलेज, गोखले अर्थशास्त्र संस्था अशा नामांकित संस्था इथे आहेत. फर्ग्युसन कॉलेजचा, तर आजही भौकाल कायम आहे. गुडलक चौक ते फर्ग्युसन कॉलेजचा रस्त्यावरील युवक युवतींमधील ऊर्जा पाहून नेहमी कुतूहल वाटते. त्यामुळे हे शहर माझ्या हृदयाच्या जवळ आहे, असे द्विवेदी यांनी सांगितले.
