Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

बेगम परवीन सुलताना यांच्या गायनाने सवाईच्या चौथ्या दिवसाचा समारोप

पुणे : संतूरवर छेडलेले अपरिचित पण श्रवणीय राग आणि सिद्धहस्त गायिका बेगम परवीन सुलताना यांनी मोजक्या वेळात रंगवलेला राग रागेश्री, ही सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या चौथ्या दिवसाची वैशिष्ट्ये ठरली.

आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित ६९ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या प्रांगणात सुरू आहे.

शनिवारी महोत्सवात चौथ्या दिवशी युवा पिढीचे प्रतिनिधी अभय सोपोरी यांच्या संतूर वादनातून रसिकांना अपरिचित रागांच्या सौंदर्याची अनुभूती मिळाली.
तब्बल नऊ पिढ्यांची कलापरंपरा वारसा रूपाने लाभलेल्या अभय सोपोरी यांनी सुरवातीला राग नंदकौंस या अनवट रागात आलाप आणि जोड, असे सादरीकरण केले. काही स्वराकृती त्यांनी आधी गाऊन दाखवल्या आणि त्यापाठोपाठ संतूरवर त्या स्वरावली वाजवल्याने श्रोत्यांना एक वेगळा अनुभव मिळाला. अभय यांनी त्यांचे वडील पं. भजन सोपोरी यांच्या सन्मानार्थ ‘भजनेश्वरी’ राग निर्माण केला आहे. या रागातील वादनासाठी त्यांनी तबल्याची साथ स्वीकारली होती. झपतालातील रचना ऐकवून त्यांनी नंतर एकतालातील ‘तोरे बिन मै कुछ भी नही’ ही बंदिश पेश केली. काश्मिरी संत कवयित्री लल्लेश्वरी यांची शैव पंथ परंपरेतील रचना सादर करून त्यांनी विराम घेतला. त्यांना सत्यजीत तळवलकर यांनी तबल्यावर तर ऋषी शंकर उपाध्याय यांनी पखवाजवर वादनाची रंगत वाढवणारी साथ केली.

सवाईच्या चौथ्या दिवसाची सांगता ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांच्या गायनाने झाली. त्यांनी रागेश्री रागात ‘सगुन विचार’ हा विलंबित ख्याल मांडला. यानंतर त्यांनी मिश्र भैरवी मध्ये भवानी दयानी ही रचना प्रस्तुत केली. प्रकृतीअस्वास्थ्य असूनही त्यांनी अगदी मोजक्या वेळात त्यांनी रागरूप दर्शवले.
बेगम परवीन सुलताना यांना पं. श्रीनिवास आचार्य (हार्मोनियम), पं. मुकुंदराज देव (तबला) यांनी तर शादाब सुलताना खान, विद्या जाईल, आम्रपाली तांबे यांनी साथ केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading