एकतर्फी विजयाने आझम स्पोर्ट्स, वॉरीयर्स अंतिम फेरीत दाखल
पुणे : आझम स्पोर्ट्स अकादमी व वॉरीयर्स संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करताना अनुक्रमे आर्यन्स व वॉव क्रिकेट अकादमी संघाना पराभूत करताना आबेदा इनामदार निमंत्रित महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
आझम स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर झालेल्या लढतीमध्ये आझम स्पोर्ट्स अकादमी संघाने आर्यन्स संघाला १२४ धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना आझम स्पोर्ट्स अकादमी संघाने निर्धारित २० षटकांत २ बाद २३१ धावा केल्या. कर्णधार किरण नवगिरेने आक्रमक फलंदाजी करताना ७८ चेंडूत २६ चौकार व ७ षटकारांच्या सहाय्याने १७० धावांची खेळी केली. तिला मानसी तिवारीने २७ (३१ चेंडू, ४ चौकार) तर संजीवनी पवारने २२ (१३ चेंडू, ४ चौकार) धावा करताना किरणला सुरेख साथ दिली. अवंती तुपेने २ गडी बाद केले.
आर्यन्स संघाला निर्धारित २० षटकांत ४ बाद १०७ धावाच करता आल्या. भक्ती पवारने ३९ (३३ चेंडू, ८ चौकर), कर्णधार श्रावणी जामदारने ३६ (४८ चेंडू, ५ चौकार), शुभांगी पाटोळेने १८ (२४ चेंडू, २ चौकार) धावा करताना लढत देण्याचा प्रयत्न केला. शरयू कुलकर्णी, जाई शिंदे व संजीवनी पवार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
सई चव्हाण आणि ज्ञानेश्वरी पाटील यांच्या भेदक गोलंदाजीने वॉरीयर्स संघाने वॉव अकादमी संघाला १० गडी राखून पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना वॉव अकादमीचा संघाने १३.२ षटकांत सर्वबाद २६ धावा केल्या. सोनाली शिंदेने ६ धावांची खेळी केली. ज्ञानेश्वरी पाटील व सई चव्हाण यांनी प्रत्येकी ३ तर अदिती वाघमारे व उत्कर्षा कदम यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. वॉरीयर्स संघाने ४.४ षटकांत बिनबाद २९ धावा करताना विजय साकारला. श्रद्धा गिरमेने १४ (१६ चेंडू, २ चौकार) तर तेजस पोळ ६ ( १३ चेंडू, १ चौकार) धावा करताना संघाला विजय मिळवून दिला.
धावफलक :
आझम स्पोर्ट्स अकादमी : २० षटकांत २ बाद २३१ : किरण नवगिरे १७० (७८ चेंडू, २६ चौकार व ७ षटकार), मानसी तिवारी २७ (३१ चेंडू, ४ चौकार), संजीवनी पवार २२ (१३ चेंडू, ४ चौकार), अवंती तुपे ३-०-३६-२ विजयी विरुद्ध आर्यन्स : २० षटकांत ४ बाद १०७ : भक्ती पवार ३९ (३३ चेंडू, ८ चौकर), श्रावणी जामदार ३६ (४८ चेंडू, ५ चौकार), शुभांगी पाटोळे १८ (२४ चेंडू, २ चौकार) जाई शिंदे २-०-८-१, शरयू कुलकर्णी ३-०-११-१, संजीवनी पवार ४-०-२४-१.
वॉव अकादमी : १३.२ षटकांत सर्वबाद २६ : सोनाली शिंदे ६ (२१ चेंडू), ज्ञानेश्वरी पाटील ४-१-७-३, सई चव्हाण ४-०-८-३, उत्कर्षा कदम २.२-१-३-२, अदिती वाघमारे ३-१-८-२ पराभूत विरुद्ध वॉरीयर्स : ४.४ षटकांत बिनबाद २९ : श्रद्धा गिरमे १४ (१६ चेंडू, २ चौकार), तेजस पोळ ६ ( १३ चेंडू, १ चौकार).
