क्रेडाई महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धा आजपासून
पुणे : क्रेडाई महाराष्ट्र ही बांधकाम व्यावसायिकांची राज्यस्तरीय संघटना विकसकांसाठी कायमच नावीन्यपूर्ण उपक्रम राबवते. यंदा प्रथमच संस्थेच्या वतीने ‘ क्रेडाई महाराष्ट्र प्रीमियर लीग ’ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा डेक्कन जिमखाना क्लब येथे २४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर या दरम्यान रंगणार आहे. २४, २५ नोव्हेंबर अनुक्रमे उपांत्यपूर्व फेरी आणि उपांत्य फेरी तर २६ नोव्हेंबरला अंतिम सामना असे स्पर्धेचे स्वरूप असणार आहे. याचे उदघाटन नगर विकास विभागाचे संचालक अविनाश पाटील यांच्या हस्ते होईल. क्रेडाइ महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार , सचिव विद्यानंद बेडेकर व कार्यकारिणी तसेच क्रेडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष अमर मांजरेकर आणि सचिव आश्विन त्रिमल या प्रसंगी उपस्थित असतील.
उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळण्यासाठी क्रेडाई महाराष्ट्रच्या वतीने प्रथम विभागीय स्तरावर स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात एकूण २२ संघांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. त्यात विजयी झालेले एकूण ८ संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले.
या ८ सामन्यात २४ नोव्हेंबरला उपांत्यपूर्व फेरी होईल. यामध्ये सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत एकूण ४ सामने होतील. पहिला सामना कोल्हापूर विरुद्ध अहमदनगर, दुसरा छ. संभाजीनगर विरुद्ध वर्धा, तिसरा नागपूर विरुद्ध इचलकरंजी तर चौथा नांदेड विरुद्ध नवी मुंबई, रायगड असा रंगेल.
अंतिम सामन्यासाठी उपांत्यपूर्व फेरीत विजयी झालेल्या संघामध्ये लढत होईल. यामध्ये पहिल्या सामन्यातील विजयी संघाची चौथ्या सामन्यातील विजयी संघाशी तर दुसऱ्या सामन्यात विजयी झालेल्या संघाची तिसऱ्या सामन्यातील विजयी झालेल्या संघाशी स्पर्धा होईल. या स्पर्धेत विजयी झालेले दोन संघ अंतिम सामन्यासाठी आमने-सामने येतील. २६ नोव्हेंबरला सकाळी ९ ते ११.३० या वेळेत चुरशीचा अंतिम सामना रंगेल. या सामन्यानंतर बक्षीस समारंभ सोहळा क्रेडाई नॅशनलचे माजी अध्यक्ष सतीश मगर यांच्या हस्ते पार पडेल. यावेळी क्रेडाई-नॅशनल चे उपाध्यक्ष सुनील फुरडे, एक्सिक्युटिव्ह कौन्सिलचे सदस्य शांतीलाल कटारिया, क्रेडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष राजीव परीख,आदी मान्यवर देखील उपस्थित राहतील.
क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार पाटील, सचिव विद्यानंद बेडेकर, सहसचिव धर्मवीर भारती, सीएसआर आणि क्रीडा समितीचे संयोजक अमित वाघमारे, स्पर्धेचे संयोजक समीर सोनावणे आणि युथ विंगचे संयोजक संकेत तुपे यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून ही स्पर्धा घेण्यात येत आहे. एचडीएफसी बँक हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक तर किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, लीड प्लस, भारती & गित्ते ग्रुप हे सहयोगी प्रायोजक आहेत.
