मसाप चे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांचे निधन
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे (वय ७३) यांचे दुःखद निधन झाले त्यांचा पाठीमागे पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे दोन बंधू असा परिवार आहे.
पायगुडे यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह, प्रमुख कार्यवाह आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यवाह म्हणून काम पाहिले. त्यांनी क्रीडा समालोचक म्हणून ही जबाबदारी पार पाडली. उत्तम सूत्रसंचालक म्हणून त्यांची ओळख होती. सरस्वती मंदिर शाळेतून त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले. पुण्याच्या शासकीय तंत्रनिकेतन मधून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरीगचा डिप्लोमा पूर्ण केला. क्रीडा पत्रकार म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. आकाशवाणी आणि दूरदर्शन साठी त्यांनी क्रीडा समालोचक म्हणून काम केले. जाहिरात व्यवसायात प्रभात पब्लिसिटी या संस्थेचे ते संस्थापक संचालक होते. स्टुडिओ एलकॉम चे संचालक होते. अनेक वृत्तपत्रात आणि मासिकात त्यांनी सदर लेखन केले. त्यांचे साहित्य वारी घुमान वारी हे पुस्तक प्रकाशित झाले.अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या कार्यकारी मंडळाचे ते सदस्य होते., स्याटरडे क्लब, रोटरी क्लब , श्रीमंत दगडशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आदी संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
