Saturday, October 17, 2026
Latest NewsPUNE

अभंगवाणीतून फुलला भक्तीचा मळा..!

पुणे : संतांच्या, कवींच्या भक्तिरसपूर्ण रचना, ओघवत्या शैलीतील निरूपण, कलाकारांचे सुश्राव्य सादरीकरण यांचा त्रिवेणी संगम श्रोत्यांनी आज अनुभवला तो ‌‘विठू माझी माऊली’ या अभंगवाणी कार्यक्रमातून.
कार्तिकी एकादशीनिमित्त शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे रत्नमोहन प्रस्तुत ‌‘विठू माऊली माझी’ या अभंगवाणी कार्यक्रमाचे आज (दि. 23) बालगंधर्व रंगमंदिरात आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे यंदाचे 24वे वर्ष आहे. प्रसिद्ध गायक संजीव मेहेंदळे, सावनी सावरकर व सचिन इंगळे यांनी भक्तीगीते सादर केली तर निलेश देशपांडे, अमृता ठाकूरदेसाई, राजेंद्र दूरकर, केदार मोरे, सोमनाथ साळुंके यांची साथसंगत लाभली. प्रत्येक रचनेचा भावर्थ-वैशिष्ट्य उलगडत रवींद्र खरे यांनी कार्यक्रमाचे निरूपण केले. संगीत संयोजन सचिन इंगळे यांचे होते तर कार्यक्रमाची निर्मिती लक्ष्मीकांत खाबिया आणि राहुल देशपांडे यांची होती.
कार्यक्रमाची सुरुवात ‌‘ओंकार प्रधान रूप गणेशाचे’ या रचनेने झाली. त्यानंतर ‌‘आरंभी वंदीन अयोध्येचा राजा’, ‌‘विठ्ठला तू वेडा कुंभार’, ‌‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’, ‌‘सावळे सुंदर रूप मनोहर’, ‌‘घनु वाजे घुण घुणा’, ‌‘गुरुविण कोण दाखवील वाट’, ‌‘तेरा मेरा मनवा कैसे’, ‌‘आम्हा न कळे ज्ञान’, ‌‘रंगा येई वो’, ‌‘विठू माउली तू’, ‌‘झाला महार पंढरीनाथ’, ‌‘देवा आता ऐसा करी उपकार’, ‌‘वृंदावनी वेणू’, ‌‘आनंदाचे डोही’, ‌‘हेचि दान देगा देवा’ अशा अनेक भावपूर्ण रचना सादर करून कलाकारांनी श्रोत्यांच्या मनात भक्तीचा मळा फुलविला.
श्रृंखलाकाव्य, सावळ्या विठ्ठलाच्या रूपाचे गुणवर्णन करणारा अभंग, ज्ञान आणि भक्तीचा समसमा संयोग दाखविणारी तसेच विठ्ठलाची आळवणी करणारी विरहिणी, अध्यात्म मार्गात गुरूंचे अनन्य साधारण महात्म्य दर्शविणारा कबिराचा दोहा अशा विविधांगी भक्तीरचनांचे वैशिष्ट्य निरूपणाच्या माध्यमातून श्रोत्यांसमोर उलगडले. कलाकारांच्या सादरीकरणाला आणि अभ्यासपूर्ण निरूपणाला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली तर पांडुरंग नामाचा जयघोष करत, कलाकारांसह ठेका धरत टाळ्यांच्या गजरात कार्तिकीची वारी अनुभवली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading