fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

वंचित बहुजन आघाडीच्या संविधान सन्मान महासभेचे राहुल गांधींना निमंत्रण!

मुंबई :  वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या संविधान सन्मान महासभेसाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना निमंत्रण पाठविले असल्याची माहिती पक्षाचे मुख्य प्रवक्ते तथा प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी दिली. २५ नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर, मुंबई येथे ही संविधान सन्मान महासभा आयोजित करण्यात आली आहे.

या निमित्ताने मुंबई येथील पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते की,  संविधान सन्मान महासभेसाठी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना निमंत्रण देण्याबद्दल आमच्या राज्य कार्यकारिणीत विचार मंथन सुरू आहे. काल यावर वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारणीचा अंतिम निर्णय होवून अखेर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पत्र पाठवले आहे.

या पत्रात त्यांनी म्हटले आहे की,

प्रिय, श्री. राहुल गांधी,
प्रथम, मी तुमचे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (INC) ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकीत केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करू इच्छितो.

समकालीन राजकारणातील तुमचा होत असलेला उदय मला तुमच्या मातोश्रींच्या (श्रीमती. सोनिया गांधी) राजकारणाच्या सुरुवातीच्या काळाची आणि 1998 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारून काँग्रेसला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी घेतलेल्या धाडसी भूमिकेची आठवण करून देतो. त्यावेळी केवळ 3 राज्यांत सत्ता असताना काँग्रेस पक्षाला स्वतःच्या नेत्यांकडून बंडखोरीचा सामना करावा लागत होता आणि त्यामुळे प्रचंड असे विभाजन झाले होते. त्या अत्यंत उद्रेकाच्या काळात आमच्या भारिप बहुजन महासंघ पक्षाने श्रीमती सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला पाठिंबा दिला होता. जेव्हा काँग्रेसचे काही प्रमुख नेते श्रीमती सोनिया गांधी यांच्या ‘विदेशी’ असल्याच्या मुद्द्याला हवा देत होते.

आज या पत्राच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला २५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आयोजित केलेल्या संविधान सन्मान सभेसाठी आमंत्रित करीत आहोत.

या सभेसाठी आम्ही काही आठवड्यांपूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडे परवानगीसाठी कागदपत्रे सादर केली होती परंतु, परवानगी आज मिळाली आहे. परवानगी मिळताच आम्ही हे पत्र तुम्हाला लिहित आहोत. भारतीय राज्यघटनेने भेदभाव सहन करणाऱ्या, उपेक्षित आणि अल्पसंख्याक समुदायांच्या हितांचे रक्षण केले आहे. संविधानाच्या प्रस्तावनेची सुरुवातीची आणि शेवटची वाक्ये : “आम्ही भारताचे लोक… हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत” ही वाक्ये संविधानाने लोकांच्या हाती दिलेली शक्ती दर्शवते. हे संविधानिक अधिकार, जे भारतीय संविधानाशिवाय शक्य नव्हते, यांचा सन्मान करण्यासाठी ही महासभा आयोजित केली आहे. संविधान आणि भारताच्या स्थापनेच्या आदर्शांचा सन्मान करण्यासाठी, माझे आजोबा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तुमचे पणजोबा श्री जवाहरलाल नेहरू आणि इतर संस्थापकांनी देशासाठी जी स्वप्न पाहिली होती, त्यांचा सन्मान करण्यासाठी ही महासभा आयोजित केली आहे.

सध्या देशात आरएसएस-भाजप, ज्यांचे अस्तित्व केवळ संविधानिक मूल्य आणि आदर्श नष्ट करण्यावर आधारित आहे, यांच्याशी लढण्याच्या आपल्या दोघांच्या वचनबद्धतेच्या आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या आधारावरून, मी वंचित बहुजन आघाडी या माझ्या पक्षाच्यावतीने तुम्हाला संविधान सन्मान महासभेचे निमंत्रण देतो. तुमच्या संबोधनादरम्यान तुम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो लोकांना संबोधित करण्याची आणि भारताच्या भविष्याबद्दल तुमची दृष्टी त्याबाबतची भूमिका मांडण्याची संधी यानिमित्ताने मिळेल. असे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात म्हटले आहे.

हे पत्र राहुल गांधी यांच्या कार्यालयाला काल संध्याकाळी प्रत्यक्षरित्या पोहचवण्यात आले आहे तसेच इमेलवरून देखील पाठवण्यात आले आहे.

Leave a Reply

%d