दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न
पुणे : विद्यार्थ्यांनी दहावीचा पेपर लिहिताना बोर्डाचे परिक्षक आणि नियंत्रक यांच्या अपेक्षेप्रमाणे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लिहायला हवे. अभ्यास करताना देखील एकाग्रता असण्याच्या दृष्टीने वातावरण तयार करुन अभ्यास करावा. असे प्रतिपादन करीअर मार्गदर्शक केदार टाकळकर यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजच्या वतीने गणेश कला क्रीडा मंच येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी बोर्ड उत्तर पत्रिका लेखन तंत्र व परीक्षा पूरक अभ्यास पद्धती या विषयावर केदार टाकळकर यांचे उपयुक्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी आणि सेवा प्रकल्प संचालक विवेक कुलकर्णी उपस्थित होते. विद्यार्थी आणि पालकांसाठी व्याख्यानाचे विनामूल्य आयोजन करण्यात आले होते.
केदार टाकळकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी अभ्यास करायला बसताना योग्य जागा निवडायला हवी. परिक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्यासोबतच आपल्या आहाराकडे देखील लक्ष द्यायला पाहिजे. शक्यतो बाहेरचे खाणे टाळावे. असेही त्यांनी सांगितले.